लातूर : उजना येथील सिद्धी शुगर्स अँड अलाईड इंडस्ट्रीजचा १७ व्या गळीत हंगाम प्रारंभ बुधवारी (ता.१४) मोठ्या उत्साहात झाला. या वर्षी दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असुन इतर सर्वच पिके हातची गेली असल्यामुळे ऊस पीकच मोठा आधार असणार आहे. शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून ऊस जगवावा. येणाऱ्या काळामध्ये उसालाच फक्त अधिकचा दर मिळू शकतो. शेतकऱ्यांनी ऊस मोडीत काढू नये, असे आवाहन कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनी यावेळी केला. पाण्याचे महत्व लक्षात घेता जलतारा व जलफेरभरणासारखे प्रकल्प राबवावेत, असे त्यांनी नमूद केले.
कारखान्याचा गळीत हंगाम प्रारंभ अकोला येथील सेव्हन स्टार डिस्टीलरीचे चेअरमन राजेंद्र जयस्वाल, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, कारखान्याचे सभासद तुकाराम जाधव, बालाजी कासले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यवस्थापकीय संचालक जाधव यांनी ऊस गाळपास आल्यानंतर लगेचच ऊसाच्या बुडक्याची छाटनी करून पाचट आच्छादन करावे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. कारखान्याचे उपाध्यक्ष पी.जी. होनराव, महाव्यवस्थापक एस. आर. पिसाळ, पुरुषोत्तम वनकुंद्रे, पी. एल. मिटकर, एस. बी. शिंदे, एल. आर. पाटील, बी. डी. सोमवंशी, ऊस विकास अधिकारी वाय. आर. टाळे, सहायक ऊस पुरवठा अधिकारी आर.एल. घाडगे, अविनाश देशमुख धसवाडीकर, बळिराम माकणे, राजपाल पाटील, बापूसाहेब जाधव, नारायण दुर्गे आदी उपस्थित होते.


















