धाराशिव : ऊस शेती हेच शेतकऱ्यांचे प्रमुख उत्पन्नाचे साधन असून, कमी पाण्यात व कमी खर्चात शेतीचे नियोजन करणे गरजेचे आहे. ३ कोटी रुपयांच्या भांडवलापासून सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्याची संपत्ती आज ४०० कोटींवर पोचली आहे. पाण्याची गरज भागवण्यासाठी ३-३ कोटींची दोन मोठी शेततळी निर्माण केली असून, सध्या ४.५० कोटी लिटर क्षमतेच्या आणखी एका शेततळ्याचे काम प्रगतीपथावर आहे. कारखाना यंदाच्या गळीत हंगामातही एफआरपीपेक्षा अधिक दर देईल, असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष अरविंद गोरे यांनी केले. केशेगाव येथे कारखान्याचा २०२६-२७ या २३ व्या ऊस गळीत हंगामाचा प्रारंभ गुरुवारी झाला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमात कारखान्याचे संचालक प्रतापराव देशमुख यांच्या हस्ते वजन काट्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विधिवत गव्हाणीत उसाची मोळी टाकून गव्हाण पूजन करण्यात आले. संचालक अॅड. नीलेश पाटील यांनी ऊस तोडणी नियोजनाची माहिती दिली. यावर्षी कारखान्याने तोडणी व वाहतूक यंत्रणेमध्ये १५० मिनी ट्रॅक्टर, २५ मोठी वाहने आणि ६० हार्वेस्टरची भर घातली आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कारखाना कार्यक्षेत्रातील तब्बल २५० शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला असून, यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे असे त्यांनी सांगितले. कमी खर्चात आणि कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी पुण्याच्या व्हीएसआय इन्स्टिट्यूटमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर प्रशिक्षण कारखाना कार्यक्षेत्रात घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी संचालक ज्ञानेश्वर बाकले यांनी सूत्रसंचालन केले. कारखान्याचे उपाध्यक्ष हनुमंत भुसारे यांनी आभार मानले.


















