बेळगाव : हालसिद्धनाथ साखर कारखान्याचा ‘अधिकारी आपल्या बांधावर’ उपक्रम; बहुबली ऊस जातीची पाहणी

बेळगाव : शेतकऱ्यांना आधुनिक ऊस जातींची माहिती मिळावी आणि ऊस उत्पादनात वाढ व्हावी, या उद्देशाने हालसिद्धनाथ साखर कारखान्याच्या ऊस विकास विभागातर्फे ‘अधिकारी आपल्या बांधावर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत भिवशी येथील शेतकरी सभासद निंगाप्पा पुजारी यांच्या शेतातील व्हीसीएफ-०५१७ (बहुबली) या ऊस जातीची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

ऊस विकास अधिकारी विश्वजीत पाटील यांनी सांगितले की, कर्नाटकातील मंड्या येथील कृषी संशोधन केंद्राशी संबंधित असलेल्या या ऊस जातीबाबत दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे. रुंद सरीतील लागवड, चांगली फुटवे क्षमता आणि खोडव्याच्या उत्पादनासाठी ही जात उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.

ChiniMandi WhatsApp Channel

व्हीसीएफ-०५१७ (बहुबली) या ऊस जातीचे सरासरी उत्पादन प्रतिएकर सुमारे ८० टन, तर खोडव्याचे उत्पादन सुमारे ६५ टन नोंदविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ऑगस्ट ते ऑक्टोबरअखेर लागवड केल्यास अनुकूल परिस्थितीत प्रतिएकर ८० ते ९० टन, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान लागवड केल्यास ७० ते ८० टन उत्पादन मिळण्याची क्षमता संशोधन व प्रात्यक्षिकांतून नमूद करण्यात आली आहे.

ऊस उत्पादन वाढविण्यासाठी केवळ सुधारित जातीची निवड पुरेशी नसून योग्य लागवड पद्धतीचा अवलंब, संतुलित खत व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन, तण नियंत्रण, रोग-किडींचे व्यवस्थापन आणि वेळोवेळी पीक पाहणी करणे आवश्यक असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पाहणीप्रसंगी नामदेव पाटील, एकनाथ पाटील, ऊस विकास विभागाचे शरद बन्ने, सौंदलगा केंद्राचे प्रमुख सचिन पाटील, शुभम पाटील, सुधीर जाधव आणि अभिषेक कदम यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here