सोलापूर : लेखी आश्वासनानंतर ‘स्वाभिमानी’चे श्री विठ्ठल कारखान्यातील आंदोलन स्थगित

सोलापूर : चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५ हजार रुपये दर मिळावा, साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १५ ऑक्टोबर रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आठ तास गव्हाण बंद आंदोलन केले. या आंदोलनानंतर कारखान्याचे चेअरमन आणि कार्यकारी संचालक यांनी ऊस दराचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेने आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

ऊस दर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेने आक्रमक भूमिका घेत हे आंदोलन छेडले होते. ऊस उत्पादनासाठी लागणारी खते, बियाणे, कीटकनाशके, मजुरी, मशागत, डिझेल आणि अन्य शेती साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात प्रतिटन ५ हजार रुपये ऊस दर मिळावा, अशी मागणी संघटनेने केली.

ChiniMandi WhatsApp Channel

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी हे साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहेत. या दरवाढीमुळे साखर कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन शेतकरी आणि साखर उद्योगाच्या हितासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले. १५ ऑक्टोबर रोजी झालेल्या आठ तासांच्या गव्हाण बंद आंदोलनानंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने ऊस दराच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढण्याबाबत लेखी पत्र दिले. या आश्वासनानंतर संघटनेने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष निर्णय घ्या!

आंदोलन स्थगित केले असले तरी ऊस दराच्या प्रश्नावर संघटनेचे लक्ष कायम राहणार आहे. कारखाना व्यवस्थापनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार तातडीने ठोस निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष दराचा तोडगा काढावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यावेळी तानाजी काका बागल, सचिन पाटील, शहाजानभाई शेख, माऊली अटकळे, सचिन आटकळे, शेखर आटकळे, अजित बोरकर, अनिकेत पाटील, दीपक पाटील, नवनाथ मोहिते, कांतीलाल नाईक नवरे, बाळासाहेब जगदाळे आणि पार्थ सुरवसे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here