महाराष्ट्र : चारा टंचाई टाळण्यासाठी ऊस तोडणी हार्वेस्टरऐवजी मजुरांमार्फतच करण्याची पशुसंवर्धन विभागाची साखर आयुक्तांना सूचना

मुंबई : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग पशुधनाच्या चाऱ्यासाठी नियोजन करत आहे. ओला चाऱ्यासाठी उसाचे वाढे घेण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यंत्राने ऊस तोडल्यास वाढे मिळत नसल्याने, तोडणीसाठी यंत्र न वापरण्याची सूचना करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभागाने चारा टंचाईवर मात करण्यासाठी ऊस आणि उसाच्या वाढ्यांचा पशुखाद्य म्हणून वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस तोडणीदरम्यान उसाचे वाढे वाया जाऊ नये, यासाठी तोडणी यंत्र (हॉर्वेस्टर) ऐवजी मजुरांमार्फत तोडणी करण्याची सूचना पशुसंवर्धन विभागाने साखर आयुक्तांना केली. त्यामुळे साखर कारखानदार, हार्वेस्टर व्यावसायिक पेचात सापडले आहेत.

राज्यातील साखर कारखान्यांकडे सुमारे २,३०० हॉर्वेस्टर यंत्रे कार्यरत आहेत. त्यावर आठ ते नऊ हजार ट्रॅक्टर चालक-मालक आणि हजारो कामगारांचा रोजगार अवलंबून आहे. लातूर जिल्ह्यातील ‘मांजरा’सारखे साखर कारखाने १०० टक्के हार्वेस्टरवर अवलंबून आहेत. तर कोल्हापूर, सांगली या साखर पट्ट्यात २५ ते ४० टक्के ऊस तोडणी ही पूर्णपणे यंत्रांवरच अवलंबून असते. यंत्रांमुळे तोडणी वेगाने होते. त्यामुळे अनेक कारखान्यांनी यंदा मजुरांशी आधीच करार केलेले नाहीत. हॉर्वेस्टरवर बंदी घातल्यास मजुरांचा तुटवडा होऊन कारखान्यांचे अर्थकारणही पूर्णपणे कोलमडण्याचा धोका आहे. हॉर्वेस्टर बंदीबाबत शासनाची भूमिका किती कठोर असेल आणि त्यावर साखर कारखानदार कसा प्रतिसाद देतील, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत साखर आयुक्त संजय कोलते म्हणाले की, राज्यात भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा टंचाई निर्माण होत आहे. उसाचे वाढे उपलब्ध झाल्यास चारा व्यवस्थापनास मोठी मदत होईल. या अनुषंगाने हॉर्वेस्टरऐवजी मजुरांमार्फत ऊस तोडणीची सक्ती करता येणार नसली, तरी कारखान्यांना याबाबत सूचना दिल्या जातील.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here