अहिल्यानगर : संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा शुक्रवारी (दि. १६) उत्साहात पार पडला. माजी अध्यक्ष अॅड. प्रतापराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक किरण शेलार यांच्या नियोजनातून कारखान्याची कामे प्रगतिपथावर असून, गळीत हंगामासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे यांनी दिली. शेतकी ओव्हरसिअर भाऊसाहेब जायभाये व त्यांच्या पत्नी रेखा जायभाये यांच्या हस्ते बॉयलरचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष ढाकणे यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
यावेळी ढाकणे म्हणाले की, साखरेच्या दरात तफावत आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे साखर कारखानदारीसमोरील आर्थिक आव्हाने अधोरेखित होत आहेत. त्यामुळे साखरेला प्रतिक्विंटल ५२०० रुपयांपर्यंत दर मिळावा अशी अपेक्षा आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही कारखाना सुरू करण्याचा निर्धार व्यवस्थापनाने केला आहे. गळीत हंगामासाठीची सर्व कामे पूर्ण झाली असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन आहे. परिसरातील इतर कारखान्यांप्रमाणे ऊसदर देण्याचा प्रयत्न आहेत. यावेळी डॉ. प्रकाश घनवट, त्रिंबक चेमटे, आयुब शेख, संदीप बोडखे, मोहनराव दहिफळे, विजय विखे, सरव्यवस्थापक रमेश गर्ने, मुख्य अभियंता प्रवीण काळुसे, चीफ केमिस्ट रामनाथ पालवे, प्रशासकीय अधिकारी पोपट केदार, चीफ अकाउंटंट तीर्थराज घुंगरड आदी उपस्थित होते. शरद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश घनवट यांनी आभार मानले.


















