कोल्हापूर : ऊसदर जाहीर न करताच छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉल्या रोखून आंदोलन केले. ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देऊ, अशी ग्वाही माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनी दिली.
कारखान्याचे संचालक प्रकाश चिटणीस यांनी सांगितले की, मागील वर्षी गाळप पूर्णपणे बंद राहिल्यामुळे यंदा कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. मात्र, या वाढीव क्षमतेची अद्याप चाचणी झालेली नाही. त्यामुळे पुढील दोन दिवसांत ही चाचणी पूर्ण करण्यात येईल.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित पोवार यांनी यंदा उसाला चांगला दर मिळण्याची शक्यता असल्याने कारखाना सुरू करण्याची घाई करू नये, असे आवाहन केले.
केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७० रुपये करावा, अशी मागणी महाराष्ट्र व कर्नाटकातील शेतकरी करत आहेत. या मागण्यांसाठी दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले आहे.या मागण्यांवर केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यास साखर कारखान्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो, असे पोवार यांनी स्पष्ट केले. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांनीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या भूमिकेला पाठिंबा दर्शविला.
या आंदोलनावेळी धनाजी पाटील, बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, बाजीराव पाटील, भिकाजी चव्हाण, अरुण पाटील, एम. डी. कुरणे, राजू पाटील, राजू पोवार, सुधीर पाटील, अण्णा मगदूम, अरुण मगदूम, जोतीराम घोडके आणि बाळासाहेब रानगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


















