सांगली : दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबतच ऊसदराच्या बाबतीत सांगली जिल्ह्यात आघाडीवर राहण्याची परंपरा दालमिया भारत शुगरच्या निनाईदेवी युनिटकडून यंदाही कायम ठेवली जाईल, असा विश्वास कारखान्याचे युनिट हेड श्रीधर गोसावी यांनी व्यक्त केला. पारदर्शक व्यवहार आणि अचूक वजनकाट्याला कारखाना प्रशासनाचे नेहमीच प्राधान्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. करूंगली-आरळा (ता. शिराळा) येथील दालमिया भारत शुगर कारखान्याच्या १३व्या गळीत हंगामाचा शुभारंभ श्रीधर गोसावी आणि त्यांच्या पत्नी वैशाली गोसावी यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला. या वेळी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
श्रीधर गोसावी म्हणाले की, साखरेच्या विक्रीदरात अपेक्षित वाढ होत नसताना उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे साखर उद्योगासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास जपण्याला प्राधान्य दिले आहे. उच्चांकी ऊसदर, पारदर्शक व्यवहार आणि अचूक वजनकाटा ही कारखान्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. यंदाच्या गळीत हंगामातही ऊसदराच्या बाबतीत जिल्ह्यात आघाडीवर राहण्यासाठी कारखाना प्रयत्नशील राहील, असे गोसावी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऊस विकास अधिकारी युवराज चव्हाण यांनी केले, तर अक्षय बुगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी मुख्य शेती अधिकारी मनोहर मिसाळ, निवृत्ती नायकवडी, मुख्य अभियंता किरण पाटील, महेश कवचाळे, दुर्गेश तोमर, राजेंद्र नाईक आणि दिनेश शर्मा यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी तसेच ऊसतोडणी व वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अक्षय बुगडे यांनी आभार मानले.


















