कोल्हापूर : ‘आंदोलन अंकुश’ची नववी एल्गार सभा येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी रात्री उशिरा झाली. पाच साखर कारखान्यांचा साखरेच्या दराचा तोडगा शिरोळच्या चौकात होईल, असा ठराव एल्गार सभेत करण्यात आला. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखान्यांपैकी कुठलाही साखर कारखाना चालवायला द्या, पाच हजार रुपये दर देतो. तसेच ५० रुपये साखरेचा दर राहिला तर, सहा हजार रुपये दर देतो, असे खुले आव्हान संघटनेचे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी यावेळी दिले. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील पाच साखर कारखानदारांना ऊसदराबाबत तोडगा काढायचा असेल तर, तो बंद खोलीत तोडगा निघणार नाही. हा तोडगा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या तख्यात निघेल, असा इशारा चुडमुंगे यांनी यावेळी दिला.
यंदा पहिली उचल ५००० जाहीर करूनच कारखाने सुरू करा, बाजारातील साखरेच्या दरावर उसाचा दर बांधून द्यावा, मशीन तोड वजावट ४ टक्केऐवजी १ टक्का करावी असे ठराव यावेळी करण्यात आले. धनाजी चुडमुंगे म्हणाले की, या वर्षी साखरेला मिळणारा दर आणि उसाचा तुटवडा पाहता, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हंगामात उसाला पाच हजार रुपये व गेल्या वर्षीच्या हंगामातील तीनशे रुपये दर मिळण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ अहिंसा मार्गाने उसाच्या तोडी नाकाराव्यात. इथेनॉल निर्मितीमुळे साखर साठा संपला आहे, साखरेचा तुटवडा आहे. तुमच्याकडे ऊस आहे, उद्योगपतींसाठी सरकारच धोरण आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याला पोषक वातावरण आहे. मात्र, सरकारला उद्योगपतींची चिंता आहे. उद्योगपतींसाठी लागणाऱ्या साखरेबाबत सरकारने रेशनिंग लावावे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, राकेश जगदाळे, उदय होगले, कृष्णात देशमुख, साक्षी बाबर, अमोल गावडे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी जोतिराम जाधव, शंकर बिराजदार, जितेंद्र चौगुले, गोपाळ चव्हाण, अक्षय पाटील आदी उपस्थित होते.


















