सांगली : कडेगाव तालुक्यात ऊस दरासाठी स्वाभिमानी संघटनेची जनजागृती रॅली, ऊस तोडणी बंद ठेवण्याचे आवाहन

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या ऊसदराच्या लढ्याच्या पार्श्वभूमीवर कडेगाव तालुक्यात संघटनेने जनजागृती रॅली काढली. ऊस दराचा तोडगा निघेपर्यंत ऊसतोड घेऊ नका, असे शेतकऱ्यांना आवाहन केले. तालुक्यातील वांगी, कडेपूर, कडेगाव, तडसर, अंबक, चिंचणी आणि शिरसगाव परिसरात रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. सोनहिरा साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या टायरमधील हवाही कार्यकर्त्यांनी सोडली. तोडगा निघण्यापूर्वी कारखाना सुरू ठेवला तर तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला. उसाला प्रतिटन ५,००० रुपयांपेक्षा अधिक दराची मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, ऊस दर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरसगाव येथे शेतकऱ्यांनी ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत गावातील तोड बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला. या भूमिकेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वागत करून ग्रामस्थांचे कौतुक केले. या गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. महिलांनी त्यांचे औक्षण केले. सोनहिरा कारखान्याचे संचालक पी. सी. जाधव, दिलीपराव सूर्यवंशी, युवराज कदम, उपाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत कारखाना बंद ठेवण्याची ग्वाही दिल्याचे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. संदीप राजोबा, सचिन शिंदे, संजय बेले, विठ्ठल मोरे, विक्रम पाटील, विशाल चौगुले, भीमराव माने, बाळासाहेब जाधव, इम्रान पटेल, अशोक पवार, दीपक लाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here