पुणे : वैधमापन शास्त्र विभागाकडून प्रमाणित करण्यात आलेल्या कोणत्याही खासगी वजन काट्यावर वजन करून आणलेला ऊस साखर कारखान्यांना नाकारता येणार नाही. तसेच, खासगी वजन काटा आणि साखर कारखान्याच्या वजन काट्यावरील वजनात तफावत आढळल्यास संबंधित शेतकऱ्याला तक्रार दाखल करण्याचा अधिकार असेल. या तक्रारीची दखल घेऊन सुनावणी केली जाईल, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, वजन काट्यांवरील संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी साखर आयुक्तालयाने यापूर्वीच साखर कारखान्यांना वजन प्रक्रियेबाबत आवश्यक सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याने ऊस वजनातील तफावतीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी पुन्हा वाढू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी वजनातील गैरप्रकार रोखण्यासाठी नव्याने आदेश जारी केले आहेत.
शेतकऱ्यांवर कारवाई करता येणार नाही
खासगी वजन काट्यावर ऊसाचे वजन करून आणल्याच्या कारणावरून संबंधित शेतकरी, वाहनचालक किंवा मुकादम यांच्यावर साखर कारखान्यांना कोणतीही कारवाई करता येणार नाही. तसेच, खासगी काट्यावर वजन केलेल्या ऊसाच्या गाड्यांचा क्रम जाणीवपूर्वक डावलता येणार नाही. याशिवाय, खासगी वजन काट्यावर ऊसाचे वजन केल्यामुळे पुढील वर्षासाठीची ऊस नोंदणी रद्द करणे किंवा संबंधित शेतकऱ्याचे सभासदत्व रद्द करणे, असे प्रकारही अवैध ठरतील, असे साखर आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.
वजनात तफावत आढळल्यास चौकशी
खासगी वजन काट्यावर केलेले वजन आणि साखर कारखान्याच्या वजन काट्यावर नोंदवलेले वजन यामध्ये तफावत आढळल्यास संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल. तसेच, वजनातील गैरप्रकार रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन होत नसल्यास शेतकऱ्यांना संबंधित यंत्रणांकडे तक्रार दाखल करता येणार आहे. यासाठी शेतकरी प्रादेशिक साखर सहसंचालक तसेच वैधमापन शास्त्र विभागाच्या जिल्हा उपनियंत्रकांकडे तक्रार करू शकतात, अशी माहिती साखर आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने दिली.
भरारी पथके असूनही काटामारीच्या तक्रारी
ऊस वजनातील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तरीही वजनात तफावत, ऊसाच्या वजनाची नोंद वेळेवर उपलब्ध न होणे आणि वजन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव यांसारख्या तक्रारी शेतकरी संघटनांकडून सातत्याने केल्या जात आहेत. खासगी वजन काट्यावर केलेले वजन साखर कारखान्याच्या काट्यावर कमी भरते आणि खासगी काट्यावरील वजन ग्राह्य धरले जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते, असा ऊस उत्पादकांचा आरोप आहे. खासगी काट्यावरील वजन स्वीकारले जात नसल्यामुळे वजनातील गैरप्रकारांना संरक्षण मिळत असल्याचीही शेतकऱ्यांची तक्रार आहे.
वैधमापन शास्त्र विभागाचा महत्त्वपूर्ण अभिप्राय
या प्रश्नावर साखर आयुक्तालयाने राज्याच्या वैधमापन शास्त्र विभागाकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यावर विभागाने ‘वैधमापन शास्त्र (सर्वसाधारण) नियम, २०११’नुसार वजन काट्यांची पडताळणी आणि मुद्रांकन करण्याची प्रक्रिया एकसमान असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वैधमापन शास्त्र विभागाकडून अधिकृतरीत्या प्रमाणित केलेल्या खासगी वजन काट्यावर वजन केलेला ऊस केवळ खासगी काट्यावर वजन केल्याच्या कारणावरून साखर कारखान्याने नाकारणे ही अनुचित प्रथा ठरेल, असा स्पष्ट अभिप्राय विभागाने दिला आहे. एकूणच, खासगी वजन काट्यावरील वजनाला मान्यता देण्याबाबत साखर आयुक्तालयाने घेतलेल्या भूमिकेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वजनातील तफावत, पारदर्शकतेचा अभाव आणि काटामारीच्या तक्रारींवर आता संबंधित यंत्रणा कोणती कारवाई करतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















