शेतकऱ्यांनी कुठेही ऊस वजन करून ओंकार शुगरच्या कोणत्याही युनिटला ऊस घालावा : ओंकार शुगर ग्रुप अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ऊसदर देण्याचा प्रयत्न ओंकार शुगर ग्रुप करणार असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसबिले आणि ऊस वाहतूकदारांची देयके आठ दिवसांत अदा केली जातील, अशी ग्वाही ओंकार शुगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली. म्हैसगाव (ता. माढा, जि. सोलापूर) येथील ओंकार शुगर युनिटच्या २०२६-२७ च्या गळीत हंगामाच्या मोळीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. ऊस वजनकाट्याबाबत शेतकऱ्यांनी कोणतीही शंका मनात ठेवू नये. शेतकऱ्यांनी त्यांना योग्य वाटेल त्या ठिकाणी आपल्या उसाचे वजन करून घ्यावे आणि त्यानंतर ओंकार शुगरच्या कोणत्याही युनिटला ऊस पाठवावा, असे आवाहन बोत्रे-पाटील यांनी केले.

आगामी काळात आदिनाथ सहकारी साखर कारखानाही पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच, यापुढे ऊस उत्पादक आणि वाहतूकदारांची देयके आठ दिवसांच्या आत त्यांच्या बँक खात्यांवर जमा केली जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.या कार्यक्रमाला ओंकार शुगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस्विनी बर्गे, वारणा बँकेचे व्यवस्थापक कुमार पाटील, महाव्यवस्थापक सुनील बंडगर, प्रशासकीय अधिकारी चक्रधर घुले, ऊस शेतीतज्ज्ञ भारत रोकडे, वामनभाऊ उबाळे, मुकुंद उबाळे यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि वाहतूकदार उपस्थित होते.

ChiniMandi WhatsApp Channel

सीएनजी प्रकल्पामुळे ऊसदरात प्रतिटन ५० रुपयांची वाढ शक्य

माजी आमदार संजय (मामा) शिंदे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कमी कालावधीत कारखान्याची उभारणी केली. भविष्यात शेतकऱ्यांना अधिक ऊसदर देता यावा, या दूरदृष्टीतून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली होती. प्रस्तावित सीएनजी प्रकल्पामुळे भविष्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ५० रुपये अतिरिक्त दर देणे शक्य होऊ शकते, असे मत बाबूराव बोत्रे-पाटील यांनी व्यक्त केले.

२५ ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप

दसरा सण संपल्यानंतर दिवाळीच्या निमित्ताने २५ ऑक्टोबरपासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटप सुरू करण्यात येणार आहे. मागील वर्षी सुरू केलेली ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात येणार असल्याचे बोत्रे-पाटील यांनी सांगितले.शेतकऱ्यांनी कारखान्याला पुरविलेल्या उसाच्या प्रमाणानुसार त्यांना साखरेचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून मोफत साखर उपलब्ध होणार आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here