कोल्हापूर : महाराष्ट्रात 2026-27 ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, 22 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील 65 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केल्याची माहिती राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ‘चीनीमंडी’शी बोलताना दिली. ते म्हणाले, आतापर्यंत एकूण 158 साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. उर्वरित कारखान्यांना परवाना देण्यासाठी अर्जांची तपासणी आणि छाननी केली जात आहे.पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु असल्याने अद्याप हंगामाला गती मिळालेली नाही. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्ह्यातील कारखाने सुरु करण्याबाबत दोन दिवसांत संयुक्त बैठक घेणार असल्याचे जाहीर केले आहे. या बैठकीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगामाला गती येण्याची शक्यता आहे.
75 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता : अॅग्रीमंडी लाइव
यंदाच्या हंगामावर शेतकरी संघटनांचे आंदोलन आणि दुष्काळाचे सावट पाहायला मिळत असून साखर हंगाम साधारण 90 ते 100 दिवस चालण्याचा अंदाज आहे. साखर आयुक्त कार्यालयाने राज्यात यंदा 90.18 लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर 2026- 27 च्या गाळप हंगामात साखर उत्पादनात सुमारे 20 टक्क्यांची घट होऊन उत्पादन जवळपास 80 लाख टनांवर येण्याची शक्यता वेस्ट इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे (WISMA) अध्यक्ष बी.बी.ठोंबरे यांनी व्यक्त केली. ‘अॅग्रीमंडी लाइव’ने राज्यात झालेल्या पावसाची स्थिती, पिकाची वाढ आणि भविष्यातील परिस्थिती आदीचा आढावा घेऊन चालू हंगामात 75 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे.
158 कारखान्यांना मिळाले गाळप परवाने
राज्यात 22 ऑक्टोबरपर्यंत 65 कारखाने प्रत्यक्ष सुरू झाले आहेत.साखर आयुक्त कार्यालयामार्फत आतापर्यंत 158 कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. उर्वरित कारखाने टप्प्याटप्प्याने सुरू होण्याची शक्यता आहे. कारखाने सुरू होण्याचा वेग, उपलब्ध ऊस आणि गाळपाची क्षमता यावर हंगामाचे एकूण चित्र अवलंबून राहणार आहे. यंदाचा हंगाम 90 ते 100 दिवस चालण्याचा अंदाज आहे. मात्र, प्रत्यक्ष हंगामाचा कालावधी हा ऊस उपलब्धता, कारखान्यांची कार्यक्षमता आणि हवामान परिस्थितीवर अवलंबून असेल. पावसातील असमानता आणि काही भागांतील पाणीटंचाईचा ऊस पिकावर किती परिणाम झाला आहे, हे आगामी काळात स्पष्ट होईल. ऊस उत्पादनात संभाव्य घट झाल्यास कारखान्यांना उपलब्ध होणाऱ्या उसाच्या प्रमाणावर आणि गाळपाच्या कालावधीवर परिणाम होऊ शकतो. परिणामी, राज्याच्या एकूण साखर उत्पादनाच्या अंदाजातही बदल होण्याची शक्यता आहे.
राज्यातील शेतकरी संघटनांची मागणी काय ?
साखरेची एमएसपी ३१ रुपयांवरून ५० रुपये प्रतिकिलो करावी आणि इथेनॉलचा दर ७० ते ७५ रुपये प्रतिलिटर करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटना विविध पातळ्यांवर आंदोलन करत आहेत. साखरेला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे, घरगुती व औद्योगिक साखरेचे स्वतंत्र कोटे आणि दर निश्चित करावेत तसेच दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी, ऊस उत्पादक शेतकरी, सहकारी साखर कारखाने आणि कामगारांचे प्रश्न सोडवावेत, अशा प्रमुख मागण्या शेतकरी संघटनांकडून करण्यात आल्या आहेत.
कारखानदार आणि शेतकऱ्यांची केंद्रात संयुक्त बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) प्रतिकिलो ५० रुपये आणि इथेनॉलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारच्या पातळीवर शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे साखर आणि इथेनॉलच्या दरवाढीच्या मागण्यांवर केंद्रात चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सांगली दौऱ्यादरम्यान भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश खराडे, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि जय शिवराय संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांच्यासह विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन सादर करण्यात आले.


















