अहिल्यानगर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा प्रारंभ

अहिल्यानगर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या ऊस गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगामाचा प्रारंभ महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाला. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी संचालक यशवंत व पत्नी अर्चना रणनवरे, कारखान्याचे डेप्युटी चिफ इंजिनिअर विकास व पत्नी माधुरी शिवरकर यांच्या हस्ते विधिवत बॉयलर पूजन झाले. संचालक बाबासाहेब व पत्नी आशा आदिक, कारखान्याचे उपशेतकी अधिकारी प्रदीप व पत्नी जयश्री शिंदे या उभयतांच्या हस्ते विधिवत गव्हाण पूजन झाले. बदलत्या परिस्थितीत कारखाना अधिक सक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन सराला बेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी केले. अशोक कारखान्याने गेल्या ६९ वर्षांत तालुक्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. असे ते म्हणाले.

कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार भानुदास मुरकुटे म्हणाले, अशोक कारखाना परिसरातील शेतकऱ्यांचा हक्काचा कारखाना असून, त्यांनी आपला ऊस येथेच द्यावा. सभासद, कामगार, कर्मचारी, तसेच ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदारांनी हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. यंदा पुरेशा पावसाअभावी ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासमोर आव्हाने आहेत. उपलब्ध संसाधनांचे योग्य नियोजन करून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील. साखरेच्या बाजारभावाचा विचार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. यावेळी माजी संचालक काशिनाथ गोराणे यांनी मनोगत व्यक्त केले. पुंजाहरी शिंदे यांनी अध्यक्षीय सूचना मांडली. बाबासाहेब आदिक यांनी अनुमोदन दिले. डॉ. मंगेश उंडे यांनी सूत्रसंचालन केले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here