कर्नाटक : ऊसदराच्या तोडग्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बेळगावमध्ये बैठकीचे आयोजन

बेळगाव : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २६) येथील सुवर्णसौध येथे ऊसदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी प्रतिनिधी आणि साखर कारखानदारांची बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस पोलिस आयुक्त प्रकाश निकम, जिल्हा पोलिसप्रमुख के. रामराजन, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातील १५ जिल्ह्यांतून प्रत्येकी चार शेतकरी प्रतिनिधींना बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, आमदार, खासदार आणि विधान परिषद सदस्यही उपस्थित राहणार आहेत.

ऊसदराच्या या बैठकीमध्ये राज्यातील १५ जिल्ह्यांतील एकूण ८१ साखर कारखान्यांचे प्रतिनिधी सहभागी होतील. बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून, सुरक्षा, वाहतूक, भोजन आणि शेतकऱ्यांच्या सोयीसुविधांच्या नियोजनावर भर दिला आहे. बैठकीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी सुवर्णसौध परिसरात येण्याची शक्यता असल्याने गर्दीचे नियोजन आणि पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात येत आहे. उपस्थित शेतकऱ्यांसाठी भोजनाची सोय करण्याबाबतही प्रशासनाने नियोजन केले आहे. बैठकीतील चर्चा आणि निर्णयांची माहिती बाहेर उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळावी, यासाठी परिसरात एलईडी स्क्रीन बसविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातील प्रतिनिधींशी समन्वय साधण्यासाठी १५ नोडल अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऊसदराच्या प्रश्नावर होणाऱ्या चर्चेकडे शेतकरी आणि साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here