पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व खासदार पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गाळप हंगामासाठी ऊस उत्पादकांना प्रतिटन ३,८०० रुपये अंतिम ऊसदर जाहीर केला होता. त्यानुसार उर्वरित अंतिम बिल प्रतिटन पाचशे रुपयांप्रमाणे सभासदांच्या खात्यावर वर्ग केले आहेत; तर कामगारांना १५ टक्के आगाऊ बोनस दिवाळी भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी ही माहिती दिली. कारखान्यातर्फे कायम व हंगामी कामगारांसाठी १५ टक्के बोनस व अॅडव्हान्सपोटी ३.३३ कोटी रुपये, तर कंत्राटी कामगारांना ८,५०० रुपयांप्रमाणे २१ लाख रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे. याशिवाय वेतनवाढीतील फरकाची पहिल्या हप्त्याची १.६८ कोटी रुपये आणि रोजंदारी पगाराची रक्कम २८ लाख रुपये रक्कम कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकारी संचालक यादव म्हणाले की, कारखान्याने मागील हंगामातील ऊसदरापोटी नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यातील तुटलेल्या उसासाठी प्रतिटन ३,८०० रुपये, फेब्रुवारीत तुटलेल्या उसासाठी ३,९०० रुपये, तर मार्चमध्ये तुटलेल्या उसासाठी प्रतिटन ४,०००۰ रुपये दर जाहीर केला होता. तर, गेटकेन उसाला अंतिम ऊसदर प्रतिटन ३,४०० रुपये निश्चित केला होता. यापूर्वी प्रतिटन ३,३०० रुपये दिले होते. आता उचल वजा जाता सभासदांना प्रतिटन ५०० रुपये; तर गेटकेनधारकांना उर्वरित १०० रुपये प्रतिटनाप्रमाणे रक्कम दिली गेली. गेल्या हंगामात कारखान्याने १२,१८,५५९ टन उसाचे गाळप केले असून, सरासरी १२.२७ टक्के साखर उताऱ्यासह १५,५७,६५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सहवीज प्रकल्पातून वीज निर्मिती, डिस्टिलरी प्रकल्पातून अल्कोहोल व इथेनॉल उत्पादनही घेण्यात आले. आता चालू हंगामात १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू झाले असून, आतापर्यंत ६१,५२० टन उसाचे गाळप झाले आहे. यंदा ३८,५०० एकर क्षेत्रावर ऊस लागवड असून, १२ ते १२.५० लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.


















