सोलापूर : दि सासवड माळी शुगर फॅक्टरीने यंदाच्या गळीत हंगामात साडेतीन लाख मेट्रिक टनांहून अधिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. परिसरातील अन्य साखर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्यासह शेतकऱ्यांची ऊसबिले वेळेत अदा करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मोहन लांडे यांनी दिली.कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामातील पहिल्या पाच साखर पोत्यांचे पूजन मोहन लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हंगामाचे उद्दिष्ट आणि शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या ऊसदरासंदर्भात माहिती दिली.यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन विशाल जाधव, संचालक राहुल गिरमे, शुगरकेनचे संचालक सुरेश राऊत, नरेंद्र गिरमे आणि अनिल झगडे उपस्थित होते.
मागील हंगामात प्रतिटन ३,००५ रुपये ऊसदर
मागील गळीत हंगामात कारखान्याची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) प्रतिटन २,५४६ रुपये असताना, कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन ३,००५ रुपये ऊसदर दिला. म्हणजेच एफआरपीपेक्षा प्रतिटन ४५९ रुपये अधिक दर देण्यात आला होता.यंदाच्या हंगामातही शेतकऱ्यांची ऊसबिले वेळेत अदा केली जातील आणि परिसरातील अन्य साखर कारखान्यांच्या तुलनेत योग्य ऊसदर देण्याचा प्रयत्न राहील, असे लांडे यांनी स्पष्ट केले. कारखान्याला अधिकाधिक ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले.
साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्राने उपाययोजना कराव्यात
कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक गणेश इनामके यांनी साखर उद्योगासमोरील आर्थिक अडचणींकडे लक्ष वेधले. खासगी साखर कारखान्यांनाही कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि अन्य आवश्यक सवलती द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.साखर उद्योग आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत तातडीने वाढवावी, असेही इनामके यांनी नमूद केले.
कामगारांना दिवाळीपूर्वी १० टक्के बोनस
कारखान्यातील कामगारांना दिवाळीपूर्वी १० टक्के बोनस आणि एका महिन्याचा पगार देण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक गणेश इनामके यांनी दिली.यंदाच्या हंगामात निर्धारित गाळप उद्दिष्ट साध्य करण्यासोबतच शेतकऱ्यांना वेळेत बिले आणि योग्य ऊसदर देण्यावर कारखाना व्यवस्थापनाचा भर राहणार आहे.


















