कोल्हापूर : ऊसदराचा तिढा अद्याप कायम असल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. ऊसाला प्रतिटन साडेचार हजार रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुरुंदवाड येथे कर्नाटकातून दिल्लीला साखर घेऊन जाणारा ट्रक अडवण्यात आला, तर सांगली जिल्ह्यातील आरग परिसरात ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चार वाहने पेटवण्यात आल्याची घटना घडली. दुसरीकडे, वाठार येथे वारणा साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखण्यात आली. कारखाना व्यवस्थापनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
कुरुंदवाडमध्ये साखरेचा ट्रक रोखला
ऊसदराचा प्रश्न सुटलेला नसताना साखर कारखान्यांतून साखरेची वाहतूक सुरू असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कुरुंदवाड येथे साखरेचा ट्रक अडवला. कर्नाटकातील एका साखर कारखान्यातून ३० टनांहून अधिक साखर घेऊन हा ट्रक मिरज रेल्वे स्थानकाकडे जात होता. तेथून रेल्वेमार्गे साखर दिल्लीला पाठवली जाणार होती.
या वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाच मैल परिसरापासून ट्रकचा पाठलाग केला. कुरुंदवाड येथे ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये साखरेची पोती असल्याचे आढळले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी ट्रकच्या चाव्या काढून घेत वाहतूक रोखली.
विशाल चौगुले, बंडू पाटील आणि विक्रम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी ट्रकमधील साखर खाली उतरवून शेतकऱ्यांना वाटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी हस्तक्षेप करत हा प्रयत्न रोखला. कार्यकर्त्यांना ट्रकमधून खाली उतरवून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्याकडे रवाना केला.
ऊसदराचा तोडगा निघेपर्यंत ऊसतोडणी होऊ देऊ नये आणि साखर कारखान्यांतून साखरेची वाहतूक रोखावी, असे आवाहन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले. या आंदोलनात बंडू उमडाळे, सचिन शिंदे, वर्धमान भबिरे, शिवाजी रोडे, प्रमोद चौगुले आदी सहभागी झाले होते.
वाठारमध्ये वारणा कारखान्याची ऊस वाहतूक रोखली
हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वारणा साखर कारखान्याची ऊस वाहतूक रोखून धरली. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागण्यापूर्वी वाहतूक सुरू असल्याने संघटनेने हे आंदोलन केले.
या वेळी कारखान्याचे संचालक रवींद्र जाधव, उदय पाटील, सुभाष जाधव, प्रदीप देशमुख आणि महेंद्र शिंदे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. वारणा साखर कारखाना एफआरपीपेक्षा प्रतिटन एक रुपया अधिक दर देईल, अशी ग्वाही संचालक रवींद्र जाधव यांनी दिली.
व्यवस्थापनाकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर ऊस वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. यावेळी धनाजी पाटील, अण्णा मगदूम, सुधीर मगदूम, सुनील सूर्यवंशी, उमेश पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र मालगावे, संपत पवार, हरिभाऊ जाधव आणि शिवेंद्र माने आदी उपस्थित होते.
आरग परिसरात चार वाहने पेटवली
सांगली जिल्ह्यात ऊसदराच्या मागणीवरून संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. मिरज तालुक्यातील आरग आणि लक्ष्मीवाडी परिसरात ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी चार वाहने पेटवण्यात आल्याची घटना घडली. मल्लेवाडी-आरग रस्त्यावर मोहनराव शिंदे साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या उसाने भरलेल्या ट्रॅक्टरना आग लावण्यात आली. हे कृत्य अज्ञात व्यक्तींनी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे मिरज पूर्व भागातील वातावरण तापले असून ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चालू हंगामासाठी उसाला प्रतिटन साडेचार हजार रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली आहे. मात्र, साखर कारखानदारांनी दर जाहीर न करताच कारखाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
यापूर्वी भोसे परिसरात श्री दत्त इंडियाची सुमारे शंभर वाहने रोखण्यात आली होती. संघटनेचे संदीप राजोबा यांनी शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर सरकार दुहेरी भूमिका घेत असल्याचा आरोप केला.
धरणांमध्ये ८५ टक्के पाणीसाठा असतानाही नद्या कोरड्या पडत असून नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ येत आहे. दुसरीकडे, ऊस वाळण्याची भीती दाखवून शेतकऱ्यांना ऊसतोडणीसाठी भाग पाडले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुगळीतील शेतकऱ्यांचा ऊसतोडणी बंद ठेवण्याचा निर्णय
गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसदर जाहीर होईपर्यंत गावातील ऊसतोडणी बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. गावातील बसवेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीला शेकडो शेतकरी उपस्थित होते.
ऊसदराचा प्रश्न निकाली निघेपर्यंत माघार घ्यायची नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी या बैठकीत व्यक्त केला. शासन आणि शेतकरी संघटनेकडून ऊसदर जाहीर होईपर्यंत ऊसतोडणी बंद ठेवण्याचे ठरवण्यात आले. तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या रॅलीत सहभागी होण्याचाही निर्णय घेण्यात आला.
ऊसतोडणीची खुशाली, ट्रॅक्टर एन्ट्री आणि अर्धवट ऊसतोडणी यांसारख्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा झाली. ऊस उत्पादनासाठी वाढता खर्च, शेतीतील वाढती गुंतवणूक आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेता उसाला योग्य दर मिळणे आवश्यक असल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत एकजुटीने लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अरुण आरबोळे, संतोष भोसले, बाळासाहेब महाडिक, ढुंडेश माने आणि संजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. निखिल शिरकोळे यांनी स्वागत केले, तर बजरंग भोसले यांनी आभार मानले.
ऊसदराच्या तोडग्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत ऊसदराच्या मागणीवरून आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. एका बाजूला साखर वाहतूक आणि ऊस वाहतूक रोखण्याचे प्रकार घडत आहेत, तर दुसरीकडे काही गावांमध्ये ऊसतोडणी बंद ठेवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. वारणा कारखान्याने दिलेल्या आश्वासनानंतर वाठारमधील आंदोलन मागे घेण्यात आले असले, तरी एकूण ऊसदराचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे साखर कारखानदार आणि शासन याप्रश्नी कोणती भूमिका घेतात, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















