बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदरासंदर्भातील मागण्यांवर येत्या २९ ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या सल्लागार समितीशी चर्चा करून शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, सरकारच्या आवाहनानंतरही शेतकरी नेत्यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिल्याने ऊसदराचा तिढा कायम आहे. शेतकरी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवकुमार यांनी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरळीत सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. गाळप प्रक्रियेत दीर्घकाळ अडथळे निर्माण झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच बसू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
साखरेच्या एमएसपीत वाढ करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा
केंद्र सरकारकडून साखरेच्या किमान विक्री किमतीत (एमएसपी) वाढ झाल्याशिवाय राज्य सरकारला ऊसदरासंदर्भात अंतिम निर्णय घेणे कठीण असल्याचे मुख्यमंत्री शिवकुमार यांनी सांगितले. साखरेच्या एमएसपीमध्ये वाढ करण्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिल्याची माहितीही त्यांनी दिली.याशिवाय, महाराष्ट्रासह अन्य ऊस उत्पादक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी नेत्यांचा आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार
मुख्यमंत्र्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले असले, तरी शेतकरी नेते चन्नाप्पा पुजारी यांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. गुर्लापूर क्रॉस येथे लाखो शेतकरी एकत्र आले असून, ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.उसाच्या उपपदार्थांपासून मद्य, स्पिरिट आणि इथेनॉल निर्मितीद्वारे राज्याला दरवर्षी ५० ते ६० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत असल्याचा दावा पुजारी यांनी केला. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.आता २९ ऑक्टोबरपर्यंत सरकार कोणता निर्णय घेते आणि त्यानंतर शेतकरी आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.


















