कर्नाटक : ऊसदर आंदोलनामुळे वाहतूक मार्गात बदल; गुर्लापूर क्रॉस परिसरात वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर

बेळगाव : ऊसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी मुडलगी येथील गुर्लापूर क्रॉस परिसरात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन बेळगाव जिल्हा पोलिसांनी संबंधित मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी सोमवारी वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग जाहीर केले. गोकाक, रायबाग, महालिंगपूर आणि चिक्कोडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ऊसदर आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

ChiniMandi WhatsApp Channel

ऊसदराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. ठिय्या आंदोलन, महामार्ग रोको यांसह विविध मार्गांनी शेतकरी आपला निषेध नोंदवत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री आज पुन्हा बेळगाव दौऱ्यावर असल्याने त्यांचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी मुडलगी येथील गुर्लापूर क्रॉस परिसरात सकाळी आंदोलन सुरू केले.या आंदोलनामुळे संबंधित मार्गावर वाहतुकीचा वेग मंदावण्याची आणि प्रवासासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे.

वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

गुर्लापूर क्रॉस परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने संभाव्य कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. आंदोलनस्थळाजवळ वाहने थांबवणे, रस्त्यावर गर्दी करणे किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणे टाळावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.गोकाक, रायबाग, महालिंगपूर आणि चिक्कोडी या भागांकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी पर्यायी मार्गांची माहिती घ्यावी. तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

….असे आहेत पर्यायी मार्ग

१. गोकाकच्या दिशेने जाणारी वाहने :

हरेगिरी – रायबाग – कंकणवाडी – कल्लोळी – गोकाक

२. महालिंगपूरच्या दिशेने जाणारी वाहने :

कंकणवाडी – कटकभावी क्रॉस – सवसुद्दी – मुगळखोड – हंदिगुंद – केसरगोप्प – महालिंगपूर

३. चिक्कोडीच्या दिशेने जाणारी वाहने :

महालिंगपूर – केसरगोप्प – हंदिगुंद – मुगळखोड – सवसुद्दी – कटकभावी क्रॉस – कंकणवाडी – चिक्कोडी

ऊसदराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे हा या बदलांचा उद्देश आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here