महाराष्ट्रात 26 ऑक्टोबरपर्यंत 97 साखर कारखान्यांकडून 37.3 लाख क्विंटल साखर उत्पादन

कोल्हापूर : महाराष्ट्रात 2026-27 ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, 26 ऑक्टोबरपर्यंत 97 साखर कारखान्यांकडून 37.3 लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 51.75 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 7.21 टक्के इतका आहे.

राज्यात सध्या 46 सहकारी आणि 51 खाजगी कारखाने सुरु झाले आहेत. अन्य कारखानेही लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात 26 ऑक्टोबरपर्यंत राज्यात केवळ 2 खाजगी कारखाने सुरु झाले होते. सध्या सोलापूर विभागात सर्वाधिक 23 साखर कारखाने सुरु झाले आहेत. त्यामध्ये 8 सहकारी आणि 15 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 10.99 लाख टन उसाचे गाळप करून 7.68 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा सरासरी उतारा 6.99 टक्के इतका आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

सोलापूर पाठोपाठ अहिल्यानगर विभागातील 20 कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले आहे. त्यामध्ये 11 सहकारी आणि 9 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. 7.26 टक्के उताऱ्यासह कारखान्यांनी 10.36 लाख टन ऊस गाळप करून 7.52 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नांदेड विभागात 19 कारखाने सुरु झाले असून त्यामध्ये 7 सहकारी आणि 12 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. कारखान्यांनी 5.95 लाख टन उसाचे गाळप करून 3.68 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 6.18 टक्के आहे.

पुणे विभागात 14 कारखाने सुरु झाले असून त्यामध्ये 9 सहकारी आणि 5 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. विभागात तब्बल 13.05 लाख टन उसाचे गाळप झाले असून 10.29 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा उतारा 7.89 टक्के आहे.छत्रपती संभाजीनगर विभागात 12 कारखाने सुरु झाले आहे. त्यामध्ये 6 सहकारी आणि 6 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 6.72 लाख टन उसाचे गाळप करून 4.39 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा केवळ 6.53 टक्के इतका आहे.

कोल्हापूर विभागातील साखर हंगामाला शेतकरी संघटनांच्या आंदोलनाची झळ बसल्याचे पाहायला मिळत आहे. या विभागात आतापर्यंत केवळ 8 कारखानेच सुरु झाले आहेत. त्यामध्ये 5 सहकारी आणि 3 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. अन्य साखर कारखाने ऊसदराचा तोडगा निघण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विभागात 3.96 लाख टन उसाचे गाळप होऊन 3.25 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा उतारा राज्यात सर्वाधिक 8.21 टक्के इतका आहे. अमरावती विभागात एकच खाजगी कारखाना सुरु झाला असून आतापर्यंत 0.72 लाख टन उसाचे गाळप होऊन 0.49 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी उतारा 6.81 टक्के आहे. नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरु झाला नसल्याचे दिसते.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here