कर्नाटक : राज्य सरकारने उसाची एसएपी जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

बेळगाव : देशातील ऊस उत्पादनात देशात कर्नाटकचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यात एकूण ८६ साखर कारखाने असलेल्या कर्नाटकात सध्या ऊस दरावरून संघर्ष सुरू आहे. तब्बल ३० कारखाने असणाऱ्या बेळगाव जिल्ह्यात या आंदोलनाचे केंद्र ठरले आहे. राज्यात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या जिल्ह्यांमध्ये बेळगावचा समावेश होतो. याशिवाय बागलकोट, मंड्या यांसह १६ हुन अधिक जिल्ह्यांत ऊस पिकविला जातो. पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. प्रतिटन उसाला ५,५०० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. देशात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना आणि उत्तराखंड या राज्यांत उसासाठी राज्य सरकारकडून जाहीरपणे राज्य निर्धारित किंमत (एसएपी) दिली जाते. ही किंमत केंद्राच्या एफआरपीपेक्षा अधिक असते. तमिळनाडूमध्ये एसएपी जाहीर केली जात नसली, तरी एफआरपीव्यतिरिक्त प्रतिटन २,७०९.५० रुपयांचे विशेष प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सरकारने एसएपी जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

ऊस दरप्रश्नी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकारने तज्ज्ञांचा समावेश असलेली उच्वस्तरीय संयुक्त समिती स्थापन केली आहे, मात्र, ही समिती ऊस उत्पादकांच्या समस्या सोडविण्यात यशस्वी होईल का? समितीने दिलेल्या अहवालाची सरकार अंमलबजावणी करेल का? याची कोणतीही खात्री नाही. राज्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे कारखानदार व शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. विधानसौंधमध्ये झालेल्या बैठकीतून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. दोन दिवसांत तोडगा निघेल, असे सांगून कारखाने सुरू करण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने धुडकावल्याने कारखाने सुरू होण्याचे संकेत दिसत नसल्याची स्थिती आहे. केंद्र सरकार रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) निश्चित करून तसेच साखरेच्या विक्रीवर कोटा पद्धत लागू करून बाजारपेठेवर नियंत्रण ठेवते. ही व्यवस्था बदलण्याची मागणी शेतकऱी संघटनांची आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर गुन्हाळांना प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सहकारी गट स्थापन करणे आणि सेंद्रिय गूळ, उसाचा रस तसेच उसापासून तयार होणाऱ्या अन्य प्रक्रिया केलेल्या उत्पादनांचे लघुउद्योग सुरू करणे, हे पर्याय वापरण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here