पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुण्यातील साखर संकुलात ऊस दर, एफआरपीच्या मागणीसाठी २०१५ मध्ये आंदोलन केले होते. साखर आयुक्तांची भेट न मिळाल्याने आंदोलकांनी तोडफोड, जाळपोळ केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह १५० जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयीन सुनावणीस हजर न राहिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याविरोधात काढण्यात आलेले अटक वॉरंट न्यायालयाने रद्द केले. सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा आदेश दिला. दरम्यान, २०१८ मध्ये राज्य सरकारने आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. सरकारचे त्यासंबंधीचे पत्र न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर हा खटला मागे घेण्यात आला नसल्याचे अॅड. पांडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले.
साखर संकुल येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या तोडफोडीप्रकरणी सुमारे १५० जणांविरोधात गुन्हा दाखल असून, त्यापैकी सुमारे ९० संशयित बुधवारी (ता. २८) न्यायालयात हजर झाले. हजर संशयितांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. सुनावणीस शेट्टी आणि खोत हे दोघेही उपस्थित होते. त्यांच्या वतीने अॅड. योगेश पांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्याने दोन महिन्यांपूर्वी सत्र न्यायालयाने शेट्टी, खोत यांच्यासह इतर आरोपींच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. सर्व आरोपींना आरोप निश्चितीच्या तारखेपर्यंत प्रत्येक सुनावणीला प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभा न्यायालयाने दिली. दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्याची सूचना केली होती. त्यानंतर बुधवारी सुनावणीदरम्यान दोघेही हजर राहिल्याने त्यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द केले.


















