राज्यातील ४१ साखर कारखाने गाळप परवान्याच्या प्रतीक्षेत; अटींची पूर्तता न केल्याने काही अर्ज परत

पुणे : महाराष्ट्रात २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, २८ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील १०६ साखर कारखान्यांनी मिळून ४८.६५ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात ६४.९१ लाख टन उसाचे गाळप झाले असून, सरासरी साखर उतारा ७.४९ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. मात्र, हंगाम सुरू होऊनही राज्यातील ४१ साखर कारखान्यांना अद्याप गाळप परवाना मिळालेला नाही. त्यामुळे या कारखान्यांकडून शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी स्वीकारला जाणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

यंदाच्या गाळप हंगामासाठी राज्यातील १०६ सहकारी आणि १०७ खासगी साखर कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. गाळप परवाना मिळविण्यासाठी कारखान्यांना काही अनिवार्य अटींची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये शेतकऱ्यांना मागील हंगामातील रास्त व किफायतशीर दराची (एफआरपी) १०० टक्के रक्कम अदा करणे, शासकीय शुल्क आणि थकीत कर्जाचा भरणा करणे या प्रमुख अटींचा समावेश आहे. याशिवाय, कारखान्यामुळे प्रदूषण होत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. भाडेतत्त्वावर किंवा भागीदारी पद्धतीने गाळप सुरू असल्यास त्यासंबंधीचा नोंदणीकृत करारही अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

दरम्यान, मागील आठवड्यापर्यंत १३ सहकारी आणि ९ खासगी साखर कारखान्यांचे परवाना मागणी अर्ज आवश्यक अटींची पूर्तता करण्यासाठी परत पाठविण्यात आले आहेत. तर काही कारखान्यांचे अर्ज अद्याप तपासणी प्रक्रियेत आहेत. साखर आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने दैनिक ‘अॅग्रोवन’ला दिलेल्या माहितीनुसार, परवाना वितरणाची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली असून, सर्व निकष पूर्ण करणाऱ्या कारखान्यांना ऑनलाइन पद्धतीने परवाना दिला जात आहे. त्यामुळे परवान्यासाठी आयुक्तालयात वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही. मात्र, काही कारखाने शासनाच्या अटींचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

काही अर्जांमध्ये अपूर्ण माहिती दिली जाते, तर काही कारखान्यांकडून शासकीय शुल्क भरल्याचे पुरावे जोडले जात नाहीत. अशा परिस्थितीत संबंधित कारखान्यांना परवाना देणे शक्य नसते. त्यामुळे त्रुटी दूर करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित कारखान्यांना देण्यात आल्या आहेत. सध्या राज्यातील ५१ सहकारी आणि ५५ खासगी असे एकूण १०६ साखर कारखाने सुरू झाले आहेत. उर्वरित कारखानेही लवकरच गाळप सुरू करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मागील गाळप हंगामात २८ ऑक्टोबरपर्यंत राज्यात केवळ दोन खासगी साखर कारखाने सुरू झाले होते. यंदा मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच कारखाने सुरू होण्याचे प्रमाण अधिक आहे.

शासकीय शुल्काच्या मुद्द्यावर १७ कारखान्यांचा विरोध

राज्यातील १७ खासगी साखर कारखान्यांनी शासकीय शुल्क आकारणीला विरोध दर्शविला आहे. या कारखान्यांनी शुल्कवसुलीला न्यायालयाकडून तूर्त स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे परवाना वितरणासाठी असलेल्या शासकीय शुल्क भरण्याच्या निकषातून या कारखान्यांना सवलत देत त्यांचे गाळप परवाने मंजूर करण्यात आले आहेत.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here