ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘राजारामबापू कुटुंबलाभ योजना’ जाहीर : अध्यक्ष प्रतीक पाटील यांची माहिती

सांगली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आणि कौटुंबिक सुरक्षितता देण्याच्या उद्देशाने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने ‘राजारामबापू कुटुंबलाभ योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा लाभ कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या सभासद तसेच बिगर सभासद शेतकऱ्यांना मिळणार आहे. सवलतीच्या दरात साखर, कुटुंबासाठी अपघाती विमा संरक्षण आणि कारखान्याच्या विविध उत्पादनांसह सुविधांच्या खरेदीवर विशेष पॉईंट्स अशा तीन स्वरूपांत शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली.

सातत्याने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक लाभ

ChiniMandi WhatsApp Channel

या योजनेअंतर्गत कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, कारखान्याला सलग आणि सातत्याने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पुरवठ्याच्या कालावधीनुसार अधिक प्रमाणात सवलतीची साखर मिळणार आहे.शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळावी, यासाठी अपघाती विमा संरक्षणाची सुविधाही देण्यात येणार आहे. सातत्याने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्रितपणे एक लाख ते चार लाख रुपयांपर्यंतचे अपघाती विमा संरक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे.

खरेदी आणि सुविधांवर मिळणार रिवॉर्ड पॉईंट्स

कारखान्याची जैविक उत्पादने, समृद्धी खत, गांडूळ खत आणि ऊसरोपे यांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना विशेष पॉईंट्स मिळणार आहेत. याशिवाय ठिबक सिंचन, सच्छिद्र पाइप, ड्रोनद्वारे फवारणी आणि कारखान्यामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या इतर शेतीविषयक सुविधांवर केलेल्या खर्चानुसार शेतकऱ्यांच्या कार्डवर पॉईंट्स जमा केले जाणार आहेत.कारखान्याला जितकी अधिक वर्षे सातत्याने ऊस पुरवठा केला असेल, तितके प्रत्येक खरेदी आणि सुविधेवर अधिक पॉईंट्स मिळतील. त्यामुळे नियमित ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत अधिक लाभ मिळणार आहे.

‘राजारामबापू बझार’मध्ये पॉईंट्सद्वारे खरेदीची संधी

शेतकऱ्यांच्या कार्डवर जमा होणाऱ्या पॉईंट्सचा वापर कारखाना कार्यस्थळावरील ‘राजारामबापू बझार’मध्ये करता येणार आहे. या पॉईंट्सच्या माध्यमातून किराणा माल आणि घरगुती जीवनावश्यक वस्तू सवलतीच्या दरात खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.या योजनेची सविस्तर माहिती लवकरच कारखान्याच्या शेती विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत गावोगावी पोहोचविण्यात येणार आहे. सहकार क्षेत्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणारा राजारामबापू सहकारी साखर कारखाना राज्यातील पहिला कारखाना असल्याचा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे.या योजनेचा लाभ कारखान्याला ऊस पुरवठा करणाऱ्या सर्व सभासद आणि बिगर सभासद शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कारखान्याच्या ऊस विकास विभागाशी किंवा संबंधित गटाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here