बेळगाव : अथणी तालुक्यातील शेकडो शेतकरी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केंपवाड येथील साखर कारखाना, उगार साखर कारखाना आणि कागवाड येथील शिरगुप्पी साखर कारखान्यांना भेट दिली. उसाचा दर निश्चित होईपर्यंत कारखाने सुरू करू नयेत, तसेच गोदामांमध्ये साठविलेल्या साखरेची विक्री करू नये, अशी मागणी केली. शेतकऱ्यांनी अथणी तालुक्यातील कारखान्यांना भेट देऊन कारखान्यांना साखर बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा दिला. सरकारने प्रतिटन एक हजार रुपये प्रोत्साहन अनुदानासह एकूण ५५०० रुपये दर जाहीर केल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी अथणी व कागवाड तालुक्यातील विविध साखर कारखान्यांच्या साखर गोदामांना घेराओ घालून टाळे ठोकले.
उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर निश्चित करावा आणि एसएपी लागू करावी, या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच आहे. उसाच्या दरासोबतच साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढविण्याची मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य रयत संघटनेचे प्रदेशाध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी साखर कारखान्यांना भेट देऊन साखरेची विक्री तात्पुरती थांबविण्याची मागणी केली. मागण्या मान्य होईपर्यंत साखर गोदामे उघडू नयेत, असे आवाहनही करण्यात आले. ऐनापूर शेतकरी हितरक्षण समितीचे अध्यक्ष संजय बिरडी यांनी सरकारला यापूर्वीच ४८ तासांची मुदत देण्यात आली आहे. योग्य निर्णय न झाल्यास कर्नाटक बंदची हाक दिली जाईल असे सांगितले. आंदोलनात नानासाहेब शिरगुरे, शरद पाटील, सिद्ध हवळे, पद्मकुमार आळप्पनवर, सुरेश चौगुले, अशोक इचलकरंजी, बाहुबली कुसनाळे, संजय कुसनाळे, मल्लू कोलार, अशोक अपराज, अभिषेक चौगुले, सुशांत चौगुले, अमूल कुरपे, कल्याणी तेरदाळे, चंद्रकांत अकीवाटे, जगदीश कुसनाळे यांच्यासह अनेक शेतकरी नेते सहभागी झाले होते.


















