कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगामाला गती मिळाली आहे. शहर परिसरातील साखर कारखान्यांसह लगतच्या तालुक्यांतील कारखान्यांकडील ऊस वाहतुकीमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी, अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूकदारांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. शहर वाहतूक शाखेने सुचविलेल्या मार्गनेच वाहतूक करावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे. शहर हद्दीत ऊस वाहतूक रात्री नऊ ते पहाटे सहा या वेळेतच करावी अशा स्पष्ट सूचना शहर वाहतूक साखेने जारी केल्या आहेत. ऊस वाहतूक करणारे ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाड्यांसाठी स्वतंत्र पर्यायी मार्ग देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर हद्दीतील फुलेवाडी नाका-चिवा बाजार कळंबा हॉकी स्टेडियम – सायबर हायवे कॅन्टीन (केएसबीपी चौक)-कोयास्को चौक-राष्ट्रीय महामार्ग-शिये-कसबा बावडा राजाराम कारखाना, शिये, भुये वडणगे मार्गे दालमिया कारखाना हा मार्ग ऊस वाहतुकीकरिता २४ तास खुला राहील असे वाहतूक शाखेने स्पष्ट केले आहे. तलेच उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये मोठ्या आवाजात लाऊड स्पीकर लावले जातात. यामुळे चालकांना पाठीमागील वाहनांनी दिलेला हॉर्न ऐकू येऊ शकत नाही. यामुळे अशा स्पीकरला बंदी घातली आहे. तसेच, ओव्हरलोडिंग टाळून प्रत्येक वाहनावर, बैलगाडीच्या मागे रिफ्लेक्टर लावावे; अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. छत्रपती राजाराम साखर कारखाना, डी. वाय. पाटील कारखाना व कुंभी कारखाना, बिद्री साखर कारखाना, भोगावती कारखाना आणि आसुर्ले-पोर्ले येथील दत्त दालमिया कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांनी या नियमांचे पालन करावे असे स्पष्ट करण्यात आले आहे.


















