पुणे : राज्य सहकारी बँकेने मालतारणातील खुल्या साखरेच्या मूल्यांकन दरात वाढ करून तो प्रतिक्विंटल ४२०० रुपये निश्चित केला आहे. हा सुधारित दर १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना मालतारणावर अधिक कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल देणे आता सहज शक्य असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मांडली आहे.राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना यासंदर्भातील परिपत्रक पाठविले आहे. खुल्या बाजारातील साखरेच्या दरात झालेली वाढ विचारात घेऊन बँकेच्या प्रशासक मंडळाच्या २८ ऑक्टोबर २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील ठरावानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी साखरेचे मूल्यांकन प्रतिक्विंटल ३७०० रुपये होते. त्यात वाढ करून आता ४२०० रुपये करण्यात आले आहे. त्यानुसार बँकेचा सुधारित उचल दर प्रतिक्विंटल ३७८० रुपये राहणार आहे.
साखर कारखान्यांना वाढीव आर्थिक उपलब्धता
या निर्णयामुळे २०२५-२६ हंगामातील विक्रीयोग्य साखर तसेच २०२६-२७ हंगामात उत्पादित होणाऱ्या साखरेचे मूल्यांकन सुधारित दराने केले जाणार आहे. त्यामुळे कारखान्यांच्या मालतारण खात्यावर उपलब्ध होणाऱ्या रकमेत वाढ होणार आहे. मात्र, साखर साठ्यावर बँकेकडून निर्धारित नियमांनुसार दुरावा (मार्जिन) ठेवण्यात येणार आहे. एक वर्षापर्यंतच्या साखर साठ्यावर १० टक्के दुरावा राहील, तर एक वर्षापेक्षा जुन्या साखर साठ्यावर प्रत्येक वर्षासाठी अतिरिक्त ५ टक्के दुरावा आकारण्यात येईल. तीन वर्षांपेक्षा जुना साखर साठा कर्ज उचलीस पात्र राहणार नाही; मात्र तो बँकेच्या कर्जासाठी तारण म्हणून कायम राहील.
वाढीव रकमेचा वापर करण्यावर बँकेचे निर्बंध
मूल्यांकन दरातील वाढीमुळे मालतारण खात्यावर उपलब्ध होणाऱ्या रकमेतून सर्वप्रथम कारखान्यांचा अपुरा दुरावा वसूल करण्यात येणार आहे. त्यानंतर थकीत व्याज, अल्पमुदतीचे कर्ज आणि मध्यम मुदतीच्या कर्जाचे चालू हंगामातील देय हप्ते वसूल केले जातील. या सर्व वसुलीनंतर शिल्लक राहणारी रक्कम केवळ एफआरपी अदा करण्यासाठीच उपलब्ध करून दिली जाणार आहे. इतर कोणत्याही कारणासाठी ही रक्कम वापरता येणार नाही.चालू गळीत हंगामात अंदाजित गाळपापेक्षा प्रत्यक्ष गाळप कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन बँकेने कर्जवसुलीसाठी प्रतिक्विंटल २०० रुपये अतिरिक्त टॅगिंग आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२६-२७ हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलासाठी कारखान्यांना प्रतिमेट्रिक टन २८३० रुपये उचल उपलब्ध करून दिली जाणार आहे.
४५०० रुपये पहिली उचल देण्याचा मुद्दा ऐरणीवर
राज्य सहकारी बँकेने साखरेच्या मूल्यांकन दरात केलेली वाढ साखर कारखान्यांच्या आर्थिक उपलब्धतेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. साखरेच्या वाढीव मूल्यांकनामुळे कारखान्यांना अधिक आर्थिक क्षमता मिळणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.राजू शेट्टी यांनी याच निर्णयाचा आधार घेत साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल देण्यास टाळाटाळ करू नये, अशी भूमिका मांडली आहे. राज्य बँकेने ४२०० रुपये प्रतिक्विंटल मूल्यांकन केल्यामुळे कारखान्यांना ४५०० रुपये प्रतिटन पहिली उचल देणे सहज शक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बँकेने कारखान्यांना साखर विक्रीतून मिळणारी रक्कम मालतारण खात्यात जमा करण्याचे बंधन घातले आहे. तसेच शासनाने घोषित केलेल्या एफआरपीपेक्षा अधिक ऊसदर देण्यासाठी अन्य वित्तीय संस्था किंवा बँकांकडून कर्ज घेण्यास अथवा ठेवी स्वीकारण्यासही परवानगी नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य बँकेच्या या निर्णयानंतर साखर कारखानदार ४५०० रुपये पहिली उचल देण्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


















