पुणे : पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाने वेग पकडला आहे. जिल्ह्यातील माळेगाव, सोमेश्वर, छत्रपती, नीरा भीमा, विघ्नहर, भीमाशंकर, पराग कारखान्यांनी एक लाखापेक्षा जास्त गाळप केले आहे. कर्मयोगी कारखाना (इंदापूर), घोडगंगा कारखाना (न्हावरा) व राजगड कारखाना (भोर) या तीन कारखान्यांचा गळीत हंगाम अद्याप सुरू झाला नाही. यावर्षीसुद्धा त्यांचा गळीत हंगाम बंद राहील, असे चित्र आहे. जिल्ह्यात सुरू झालेल्या १४ कारखान्यांमधून ३१ ऑक्टोबरअखेर १९ लाख ४५ हजार टन गाळप झाले.
सध्या दररोज सरासरी १ लाख २५ हजार टन गाळप होत आहे. सर्वाधिक तीन लाख ४३ हजार टन गाळप करून बारामती अॅग्रोने आघाडी घेतली आहे. दरम्यान, गळीत हंगाम सुरू होऊन २३ दिवस झाले तरी उसाच्या पहिल्या हप्त्याबाबत अनेक कारखान्यांनी मौन बाळगले आहे. दौंड तालुक्यामध्ये गुऱ्हाळघरांनी प्रतिटन ३६०० रुपये बाजारभाव दिला आहे. त्यामुळे शेतकरी आपला ऊस कारखान्याबरोबरच गुऱ्हाळघरांवर गाळपासाठी देत आहेत.
चालू वर्षी साखरेला चांगला बाजारभाव असल्याने शेतकऱ्यांना उसाला चांगला बाजारभाव मिळेल, असा अंदाज आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कारखाने पहिली उचल किमान ३५०० रुपये काढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. येत्या आठवड्याभरात जिल्ह्यातील अनेक कारखाने पहिली उचल शेतकऱ्यांच्या नावावर जमा करणार आहेत. त्यामुळे प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांना चांगल्या दराची उत्सुकता लागली आहे.
भवानीनगर येथील छत्रपती कारखान्याने पहिली उचल ३५०१ रुपये जाहीर केली आहे. बारामती अॅग्रोने गाळपामध्ये आघाडी घेत सर्वाधिक तीन लाख ४३ हजार टन गाळप केले आहे. दुसरा क्रमांक दौंड शुगर्सने मिळवला आहे. या कारखान्याने तीन लाख २० हजार टन गाळप केले आहे. भीमा पाटसने तिसरा क्रमांक मिळवत दोन लाख टन गाळप केले आहे. यवत येथील अनुराज शुगरने गळीत हंगाम सुरू केला असला तरी अद्याप फक्त ५५०० टनच गाळप झाले आहे.


















