कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी उसाला प्रतिटन ४ हजार ५०० रुपये पहिला हप्ता आणि त्यानंतर ३०० रुपये मिळावेत, या मागणीसाठी मुरगूड ते कागल पदयात्रा काढली. संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर कागल येथील गैबी चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलकांची भेट घेऊन संवाद साधला. ऊसदराचा प्रश्न सोडविण्यासाठी तोडगा दृष्टिक्षेपात असून, शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली. साखरेच्या किमान विक्री दरात (एमएसपी) वाढ झाल्यास त्यानुसार टप्प्याटप्प्याने ऊसदर देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र गड्यान्नावर, तानाजी मगदूम, डॉ. बाळासाहेब पाटील, संभाजी यादव, संदीप चौगुले आदींनी मनोगत व्यक्त केले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ‘जिल्ह्यात शेतकऱ्यांना वेळेत आणि पूर्ण एफआरपी मिळावी यासाठी जिल्हा बँक कारखान्यांना सहकार्य करत आहे. पालकमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या मागण्यांबाबत बैठक बोलावली होती. मात्र, त्या बैठकीतून ठोस निष्पन्न होणार नाही, असे वाटल्याने आपण उपस्थित राहिलो नाही. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीला शेतकरी संघटनांचे नेतेही उपस्थित होते. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सहमती झाली असून, काही बाबींबाबत परस्परांना समजावून सांगण्यात आले. सर्वच तपशील आताच सांगता येणार नसला, तरी तोडगा जवळ आला आहे. साखरेचा दर ४ हजार २०० किंवा ४ हजार ३०० रुपये झाल्यास कारखान्यांनी किती ऊसदर द्यावा, याचे टप्पे निश्चित करण्याबाबत चर्चा झाली आहे. कारखानदारांकडून लेखी हमी घेण्याचाही विचार आहे. यावेळी तालुकाध्यक्ष नामदेव भराडे, नितेश कोगनोळे, प्रमोद मगदूम, सुधीर पाटील, पंढरीनाथ पाटील, शिवाजी कासोटे, राणोजी गोधडे, पांडुरंग चौगुले, पांडुरंग अडसूळ, तानाजी चौगुले, उत्तम आवळेकर, शिवाजी कळमकर, दीपक किने, अविनाश मगदूम, प्रशांत लबाजे उपस्थित होते.



















ऊस दर वाढवून ४५००+३०० दिला पाहिजे कारण इतर सर्वच दर वाढलेले आहेत.