कोल्हापूर : ऊसदर जाहीर होण्यापूर्वीच साखर कारखान्यांकडून ऊसतोडणी सुरू करण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दालमिया साखर कारखान्याच्या ऊसतोडी बंद पाडत वाकरे (ता. करवीर) येथील कारखान्याच्या शेती कार्यालयाला टाळे ठोकले. ऊसदर जाहीर झाल्याशिवाय कारखान्याला ऊस पाठवू देणार नाही, असा ठाम इशारा कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकरी संघटनेचे परिसर अध्यक्ष बाजीराव देवाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी परिसरातील ऊस वाहतूकदार तसेच ऊसतोडणीसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधला. ऊसदराचा निर्णय होईपर्यंत ऊसतोडणी थांबविण्याचे आवाहन करण्यात आले. शेतकऱ्यांनीही संघटनेला सहकार्य केल्याने सुरू असलेल्या ऊसतोडी बंद पाडण्यात आल्या.त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी वाकरे येथील दालमिया कारखान्याच्या शेती कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यालयातील कर्मचारी आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली.
कार्यकर्त्यांनी दूरध्वनीद्वारे दालमिया कारखाना प्रशासनाशी संपर्क साधून ऊसदराच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अधिकच वाढला. अखेर कारखाना प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवत संतप्त कार्यकर्त्यांनी शेती कार्यालयाला टाळे ठोकले.या आंदोलनात बाजीराव पाटील, सुनील कापडे, भिवा खाडे, रंगराव कळके, निवास पाटील, आशीष नरके, धोंडिराम पाटील आणि शंकर मगदूम यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.


















