कर्नाटक : प्रतिटन ५,५०० रुपये ऊस दरासाठी शेतकऱ्यांचे निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूटसमोर धरणे आंदोलन

बेळगाव : ‘कर्नाटक राज्य रयत संघ हरित सेना’ आणि ‘विकास सेवा रयत संघटने’च्या संयुक्त विद्यमाने येथील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेसमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. उसाला प्रतिटन किमान ५,५०० रुपये दर मिळावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे स्पष्ट करत शेतकरी नेत्यांनी जेलभरो आंदोलन आणि उद्यापासून आमदार तसेच कारखानदारांच्या घरांना टाळे ठोकण्याचा इशाराही दिला. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.

उसाला प्रतिटन किमान ५,५०० रुपये दर आणि योग्य हमीभाव निश्चित करण्याच्या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांनी हे आंदोलन सुरू आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रतिटन ३,५०० रुपये ऊसदर देण्याचे आश्वासन दिले असले, मात्र वाढता उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा विचार करता हा दर अपुरा असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. शेतकरी नेते सुरेश परगण्णवर यांनी दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत सरकारकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास निजलिंगप्पा साखर संस्थेचे कार्यालय पूर्णपणे बंद पाडण्याचा इशारा दिला. अखंड कर्नाटक रयत संघाचे जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन हंबी यांनी कारखानदार आणि राजकीय नेत्यांवर संगनमताचा आरोप केला. केंद्र व राज्य सरकारसह साखर कारखानदारांच्या भूमिकेविरोधात संताप व्यक्त करत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here