कोल्हापूर : चालू गळीत हंगामात शासनाने उसाच्या एफआरपीमध्ये प्रतिटन शंभर रुपये वाढ केली. त्यामुळे ही रक्कम प्रतिटन तीन हजार ६५० इतकी झाली आहे. मात्र, उसाच्या लागवडीचा खर्च पाहिला, तर ही रक्कम म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाचा अपमान आहे. त्यामुळे उसाला प्रतिटन पाच हजार ५०० दर द्यावा. तसेच साखरेचा एसएमपी ५० रुपये करावा अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली. माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना याबाबत निवेदन दिले. खते, मजुरी याचे दर वाढत असताना उसाच्या एफआरपीच्या रकमेत केवळ शंभर रुपयांची वाढ करणे हा शेतकऱ्यांच्या कष्टाचा अपमान आहे. वाढता उत्पादन खर्च लक्षात घेऊन शासनाने उसाला ५,५०० रुपये एफआरपी दिली पाहिजे, अशी मागणी शेकापने केली.
याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावे. शेतकऱ्यांवर पाणीपट्टी, शिक्षण कर, सिंचनासाठी लागणारी वीज यावरील शासकीय कर रद्द करावेत, अशा मागण्या निवेदनात केल्या आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी नियमांच्या चौकटीत न अडकता सरसकट कर्ज माफ करावे. वारंवार कर्जमाफी करूनही शेतकरी आर्थिक अडचणीत का येतो याचा विचार करावा. त्यासाठी शेतीमालास योग्य भाव मिळवून देणे ही शासनाची प्राथमिकता असावी असेही निवेदनात सुचविण्यात आले आहे. निवेदन देताना बाबूराव कदम, भरत पाटील, विष्णू एकशिंगे, केरबा पाटील उपस्थित होते.


















