सातारा : उसाला पहिली उचल प्रतिटन ४ हजार ५०० रुपये आणि अंतिम दर ५ हजार रुपये मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नागठाणे येथे राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलकांनी महामार्गाच्या दोन्ही मार्गिकांवर ठिय्या दिल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
नागठाणे येथे झालेल्या या आंदोलनामुळे रात्री आठ ते नऊच्या सुमारास महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या रांगा थेट आनेवाडी टोलनाक्यापर्यंत पोहोचल्या होत्या. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर सुरू केला. साताऱ्याहून कऱ्हाड व कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटी बसेस आणि खासगी वाहनांना सायंकाळनंतर रहिमतपूर व मसूरमार्गे कऱ्हाडकडे वळविण्यात आले. काही वाहनांनी रहिमतपूर, पवार निगडी, अंगापूर, निसराळे फाटा, तसेच शेंद्रे येथून वेचलेमार्गे नागठाण्याकडे जाणारा पर्यायी मार्ग स्वीकारला.
दरम्यान, कोल्हापूरहून साताऱ्याकडे येणारी वाहने शिवडे फाटा येथून मसूरमार्गे साताऱ्याकडे वळविण्यात आली. ऊसदराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनचालक आणि प्रवाशांना पर्यायी मार्गांचा आधार घ्यावा लागला.


















