लखनौ : उत्तर प्रदेशात २०२६-२७ च्या ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, राज्यातील नऊ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. तर ३३ कारखान्यांनी ऊस खरेदीची प्रक्रिया सुरु केली आहे. गाळप सुरू केलेल्या नऊ कारखान्यांमध्ये एका सहकारी आणि आठ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. ऊस विकास विभागाच्या माहितीनुसार, सहारनपूर विभागातील तीन, मेरठमधील एक, मुरादाबादमधील दोन आणि लखनौ विभागातील तीन कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले आहे. याशिवाय, आणखी २४ कारखान्यांनी ऊस खरेदीसाठी इंडेंट जारी केले असून, दिवाळीपूर्वी कामकाज सुरू करण्याची तयारी केली आहे. उर्वरित कारखाने सणानंतर गाळप सुरू करण्याची शक्यता आहे.
गाळप हंगाम लवकर सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस वेळेत तोडून कारखान्यांना पुरवठा करता येणार आहे. त्यामुळे गहू लागवडीसाठी शेतजमीन तयार करण्यास त्यांना मदत होईल. शेत वेळेत रिकामे झाल्याने रब्बी हंगामात योग्य कालावधीत गव्हाची पेरणी पूर्ण करणे शक्य होणार आहे. ऊस विकास विभागाने सर्व साखर कारखान्यांना त्यांच्या वाटप केलेल्या ऊस खरेदी केंद्रांवर आवश्यक व्यवस्था विलंब न करता पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, निर्धारित वेळेत गाळप सुरू करून ऊस खरेदी प्रक्रिया सुरळीत ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस कारखान्यांपर्यंत पोहोचवताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, हा या सूचनांमागील उद्देश आहे.


















