कर्नाटक : ऊस दर आंदोलनासह दुष्काळामुळे ऊस टंचाई, साखर कारखानदारांना फटका

बेळगाव : राज्यात उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर द्यावा, साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढवावी आणि दर जाहीर होईपर्यंत गाळप सुरू करू नये, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे. त्यासाठी आंदोलने सुरू असून राज्य सरकारने बैठका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच पावसाचा अभाव, तीव्र उष्णता आणि अपुरा वीजपुरवठा यामुळे ऊस उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. परिणामी, यंदा अपेक्षित उत्पादन मिळण्याची शक्यता कमी असल्याची भीती व्यक्त होत आहे. कारखान्यांनी गाळप हंगामासाठी तयारी पूर्ण केली आहे. मात्र, दराचा निर्णय न झाल्याने हंगाम सुरू करण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. विलंबामुळे उत्पादन खर्चातही वाढ होऊ शकते. ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनासह दुष्काळाचा फटका साखर कारखानदारांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऊस वाळण्यापूर्वी दराचा तिढा सुटावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

नोव्हेंबर महिना उजाडला, तरी कारखान्यांची धुरांडी पेटलेली नाहीत. साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू होण्याच्या उंबरठ्यावर असताना ऊसदराचा प्रश्न पुन्हा एकदा गुंतागुंतीचा बनला आहे. उसाला योग्य दर निश्चित केल्याशिवाय कारखान्यांनी गाळप सुरू करू नये, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस उत्पादनावर परिणाम झाला असून, यंदा गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध होण्याबाबतही चिंता व्यक्त होत आहे. गेल्या नऊ वर्षांपासून साखरेच्या किमान विक्री किमतीत झालेली नसल्याचा मुद्दा शेतकरी संघटनांनी उपस्थित केला आहे. साखरेची किंमत ६० रुपयांवर नेल्यास साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर देणे शक्य होईल, असा त्यांचा दावा आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून दर निश्चित करावा आणि गाळप हंगामाबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here