राज्य सरकार ने राजू शेट्टी यांच्याशी चर्चा करून तत्काळ ऊसदराचा प्रश्न सोडवावा : आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांची दरवर्षी ऊस परिषद होते. त्या परिषदेतून उसाला किती भाव मिळाला पाहिजे, हे ते दरवर्षी सांगतात. मी स्वतः पालकमंत्री असताना त्यांच्याशी चर्चा करायचो. त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करायचो. शेतकऱ्यांना चार पैसे जास्त कसे मिळतील, यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न असायचा, असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एक बैठक घेतली, पण त्यानंतर पुन्हा बैठक झालेली नाही. मला वाटते, पालकमंत्र्यांनी त्वरित कोल्हापुरात येऊन राजू शेट्टी यांचा प्रश्न सोडवला पाहिजे. मंत्री मुश्रीफ हे या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. या दोन्ही मंत्र्यांनी विशेषतः राजू शेट्टी यांच्याशी संवाद साधला पाहिजे, असेही आ. पाटील यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel

आ पाटील म्हणाले कि, तुम्ही (प्रकाश आबिटकर, हसन मुश्रीफ) सरकारमध्ये आहात. सरकार म्हणून या प्रश्नावर मध्यममार्ग काढला पाहिजे. कारखानदारांना बोलवा, राजू शेट्टी यांनाही बोलवा आणि समोरासमोर बसून तोडगा काढा. तिकडे काहीही होऊ द्या, शेतकरी आंदोलन करू देत, आम्ही लक्ष देणार नाही, अशी सरकारची भूमिका असल्याचा आरोपही आ. पाटील यांनी केला.

आ. पाटील यांनी सांगितले कि, मी पालकमंत्री असताना दोन वर्षे राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली आणि तोडगा काढला. त्यानंतर आम्ही गळीत हंगाम सुरू केला होता. तीच भूमिका सरकारमधील या दोन मंत्र्यांनी घ्यावी, अशी आमची अपेक्षा आहे. आज उसाचे उत्पादन घटले आहे. एका बाजूला केंद्र सरकार साखरेचा किमान विक्री दर वाढवत नाही. कारखानदार एक रक्कम देण्यास तयार असतील आणि राजू शेट्टी यांची मागणी त्यापेक्षा जास्त असेल, तर त्यातील शंभर-दोनशे रुपयांचा फरक सरकारने अनुदान म्हणून द्यावा. त्यात हरकत काय आहे?, असेही त्यांनी सुचविले.

पंजाबमध्ये प्रतिटन अनुदान दिले जात असेल, तर महाराष्ट्र सरकारनेही प्रतिटन दोनशे रुपये अनुदान द्यावे. त्यामुळे कारखाने सुरू होतील. शेतात ऊस जास्त काळ राहिला, तर शेतकऱ्यांचे उत्पादन आणखी घटणार आहे. त्यामुळे सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. सरकारचे मंत्री चार्टर्ड विमानाने प्रवास करतात. मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर दोन्ही मंत्र्यांनी तातडीने कोल्हापुरात यावे, चर्चा करावी आणि आज रात्रीपर्यंत हा वाद मिटवावा. ही जबाबदारी त्यांची आहे, असे त्यांनी सांगितले.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here