पुणे : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यातर्फे दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना साखर वाटप करण्यात येत आहे. येथील बाजार समितीच्या कार्यालयात कारखान्याचे संस्थापक पांडुरंग राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक अनिल भुजबळ यांच्या उपस्थितीत साखर वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक सभासदाला २० किलो आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १० ते २० किलो साखर सवलतीच्या दरात २५ रुपये प्रतिकिलो दराने वाटप करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या शनिवारपर्यंत (ता. ७) सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत साखर वाटप होईल.
कारखान्याचे विभागीय अधिकारी दिलीप इनामके व गटप्रमुख काकासाहेब कंद यांनी सांगितले की, हडपसर, राहू, पारगाव, खामगाव, तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, अष्टापूर फाटा, उरुळी कांचन या विभागीय कार्यालयामध्ये साखर वाटप सुरू आहे. ऊस उत्पादक व सभासद शेतकऱ्यांनी विभागीय कार्यालयातून साखर नेण्याचे आवाहन कारखान्यातर्फे करण्यात आले आहे. यावेळी बाजार समितीचे सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे, सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढमढेरे, प्रगतशील शेतकरी राजेंद्र केदारी व ऊस उत्पादक, सभासद शेतकरी उपस्थित होते.


















