सोलापूर : सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या २०२६-२७ या ५४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज काडादी आणि उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते यांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आला. यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी प्रमुख उपस्थित होते. आर्थिक अडचणी, साखरेच्या दरातील चढ-उतार आणि इथेनॉलला अपेक्षित उठाव नसल्याने साखर कारखानदारीसमोर आव्हाने निर्माण झाली आहेत. अशा परिस्थितीत सभासद, बिगरसभासद शेतकरी आणि कर्मचाऱ्यांनी एकजुटीने साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले.
धर्मराज काडादी म्हणाले की, वर्षभरापासून कारखाना आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. कारखान्याची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या हमीवर एनसीडीसीकडून आठ टक्के व्याजदराने १९९ कोटी रुपयांचे कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. यंदाच्या हंगामात कारखान्याची गाळप क्षमता पूर्णपणे वापरून जास्तीत जास्त ऊस गाळप करावा, असे नियजन करण्यात आले आहे. इथेनॉलला अपेक्षित उठाव नसल्याने साखर कारखान्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, कार्यकारी संचालक एम. बी. अथणी यांनी स्वागत केले. संचालक महादेव जम्मा यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सिद्राम बबलेश्वर यांनी केले. कारखान्याचे आजी-माजी संचालक, शेतकरी सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


















