कोल्हापूर : ऊसदराच्या प्रश्नावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. यंदाच्या गळीत हंगामासाठी उसाला प्रतिटन ३९०० रुपये पहिली उचल, हंगाम संपल्यानंतर १०० रुपये आणि पुढील हंगामापूर्वी आणखी २०० रुपये देण्याच्या कारखानदारांच्या प्रस्तावाला शेतकरी संघटनांनी मान्यता दिली. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मध्यरात्री किणी टोल नाक्यावरील बेमुदत चक्काजाम आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रतिटन एकूण ४२०० रुपये मिळणार आहेत. तसेच साखरेचा दर ४५०० रुपयांच्या पुढे गेल्यास त्यातून मिळणाऱ्या वाढीव रकमेत ७० टक्के वाटा शेतकऱ्यांना देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.
मध्यरात्री दोन तासांच्या चर्चेनंतर तोडगा
ऊसदराच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत सुमारे तीन तास बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. कारखानदारांनी चार हजार रुपये प्रतिटन दर देण्यास नकार दिल्याने चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास प्रशासनाचे अधिकारी कारखानदारांचा सुधारित प्रस्ताव घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केली. यानंतर शेट्टी आणि संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एका हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांसोबत सुमारे दोन तास चर्चा केली.
मध्यरात्री एकच्या सुमारास शेट्टी आंदोलनस्थळी व्यासपीठावर आले आणि आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर आंदोलकांनी मोबाईलचे टॉर्च लावून निर्णयाचे स्वागत केले. गुलालाची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला. आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल राजू शेट्टी यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे आभार मानण्यात आले.
सांगली, सातारा जिल्ह्यांनाही दर लागू
राजू शेट्टी म्हणाले, “जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेनंतर आम्ही आंदोलन मागे घेत आहोत. ठरलेला ऊसदर सांगली आणि सातारा जिल्ह्यांनाही लागू राहणार आहे. आंदोलनामुळे नागरिकांना आणि प्रशासनाला झालेल्या त्रासाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ही लढाई सुरू होती.” दरम्यान, बैठक निष्फळ ठरल्यानंतर राजू शेट्टी यांनी उद्या, दि. ६ नोव्हेंबर रोजी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांत बंदची हाक दिली होती. मात्र, ऊसदराचा प्रश्न मार्गी लागल्याने हा बंदही मागे घेण्यात आला आहे.
एकरकमी चार हजार रुपयांच्या दरावर कारखानदारांचा नकार
गेल्या तीन दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू होते. तोडगा काढण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. सुरुवातीला प्रतिटन ३८०० रुपये दराची चर्चा झाली. त्यानंतर शेतकरी संघटनांनी चार हजार रुपये दराची मागणी केली. मात्र, कारखानदारांनी ही मागणी मान्य करण्यास नकार दिला.अखेर ३९०० रुपये पहिली उचल, हंगाम संपल्यानंतर १०० रुपये आणि साखरेला वर्षभर प्रतिकिलो ४५ रुपयांपेक्षा अधिक दर मिळाल्यास आणखी २०० रुपये देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावावर सुरुवातीला संघटनांनी आक्षेप घेतला; मात्र पुढील चर्चेनंतर ४२०० रुपयांच्या एकूण दरावर सहमती झाली.
कर्नाटकच्या दरावरूनही खडाजंगी
बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी कर्नाटकातील साखर कारखान्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कारखाने ३०० रुपये अधिक दर देत असल्याचे सांगितले. यावर शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी कर्नाटक आणि महाराष्ट्रातील उसाच्या साखर उताऱ्यात फरक असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या दरांची तुलना करणे योग्य नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

…असा मिळणार शेतकऱ्यांना ऊसदर
| तपशील | प्रतिटन रक्कम |
| पहिली उचल | ३९०० रुपये |
| हंगाम संपल्यानंतर | १०० रुपये |
| पुढील हंगामापूर्वी | २०० रुपये |
| एकूण ऊसदर | ४२०० रुपये |
विशेष तरतूद : साखरेचा दर ४५०० रुपयांच्या पुढे गेल्यास वाढीव रकमेत ७० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना मिळणार आहे.