कर्नाटकात ऊसदरासाठी प्रथमच लाभांश वाटपाचे सूत्र निश्चित; शेतकऱ्यांना मिळणार ७५ टक्के हिस्सा

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखरेच्या विक्रीतून मिळणाऱ्या अतिरिक्त नफ्यात वाटा मिळावा, यासाठी कर्नाटकातील जिल्हा प्रशासनाने यंदाच्या गळीत हंगामात प्रथमच लाभांश वाटपाचे नवे सूत्र निश्चित केले आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार आणि शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार साखरेच्या विक्रीतून मिळणाऱ्या अतिरिक्त लाभातील ७५ टक्के हिस्सा शेतकऱ्यांना, तर उर्वरित २५ टक्के हिस्सा साखर कारखानदारांना मिळणार आहे.

२०२६-२७ च्या हंगामासाठी पहिली उचल ३५०० रुपये

ChiniMandi WhatsApp Channel

आगामी २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी प्रतिटन ३५०० रुपये पहिली उचल देण्यास साखर कारखानदारांनी सहमती दर्शविली आहे. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा प्रतिटन ३५० रुपये अधिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि प्रभारी जिल्हाधिकारी राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.ठरलेल्या सूत्रानुसार, गळीत हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना प्रतिटन ३५०० रुपये दिले जातील. हंगाम संपल्यानंतर आणखी १०० रुपये अदा केले जातील. याशिवाय, नवीन गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी साखरेचा सरासरी बाजारभाव प्रतिकिलो ४५ रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यानुसार शेतकऱ्यांना अतिरिक्त मोबदला दिला जाणार आहे.

साखरेच्या बाजारभावानुसार मिळणार वाढीव ऊसदर

साखरेच्या सरासरी बाजारभावाचा विचार करून शेतकऱ्यांना मिळणारा एकूण ऊसदर निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार साखरेचा दर प्रतिकिलो ४८ रुपये झाल्यास प्रतिटन ३६५० रुपये, ४९ रुपये झाल्यास ३७५० रुपये, ५० रुपये झाल्यास ३८५० रुपये, तर ५५ रुपये झाल्यास प्रतिटन ४३५० रुपये ऊसदर मिळणार आहे.यापूर्वी शेतकऱ्यांना अदा केलेले ३६०० रुपये वजा केल्यानंतर उर्वरित वाढीव रकमेचे वाटप ७५:२५ या प्रमाणात होईल. म्हणजेच अतिरिक्त रकमेतील ७५ टक्के हिस्सा शेतकऱ्यांना, तर २५ टक्के हिस्सा कारखानदारांना मिळणार आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे गाळप हंगाम लवकर सुरू करण्यावर भर

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याची कमतरता लक्षात घेता ऊस पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी गाळप हंगाम लवकर सुरू करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. ऊस शेतात जास्त काळ राहिल्यास पाणीटंचाईचा परिणाम पिकावर होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि साखर कारखानदारांनी गाळप हंगाम तातडीने सुरू करण्यास सहमती दर्शविली आहे.साखरेच्या विक्रीतून मिळणाऱ्या अतिरिक्त लाभात शेतकऱ्यांना थेट ७५ टक्के वाटा देण्याच्या निर्णयामुळे कर्नाटकातील ऊस उत्पादकांना बाजारभाववाढीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here