कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी गतवर्षी हंगाम संपल्यानंतर अंतिम शंभर रुपये प्रतिटन हप्ता देण्याचे जाहीर केले होते. मात्र, सुमारे वर्षभराचा कालावधी उलटला तरी हा हप्ता शेतकऱ्यांना दिलेला नाही. गत हंगामातील शंभर रुपये मिळेपर्यंत ऊस तोडणी करू देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रश्नी तहसीलदार राजेश पाटील यांनी शेतकरी व कारखाना प्रतिनिधी यांची बैठक घेतली. प्रशासनातील प्रमुखांशी चर्चा करून शुक्रवारपर्यंत निर्णय देण्याचे आश्वासन कारखाना प्रतिनिधींनी दिले. तिन्ही कारखान्यांनी नवीन हंगामातील दर जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
साखर कारखानदार कोट्यवधीचा नफा मिळवत आहेत. मात्र काबाडकष्ट करून ऊस पिकवणारा शेतकरी लाभापासून वंचित आहे अशी टीका यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील यांनी केली. बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, चंद्रशेखर गावडे, तानाजी गडकरी यांनीही शेतकऱ्यांची बाजू मांडली. या वर्षीचा दर जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. कारखाना प्रतिनिधी सुधीर पाटील, चंद्रशेखर पाच्छापुरे, अश्रू लाड, भूषण देसाई यांनी प्रशासनातील प्रमुखांशी मोबाईलवरून चर्चा केली. शंभर रुपये देणार, असे आश्वासन कोणीही दिले नव्हते असे त्यांनी सांगितले. याबाबत तहसीलदारांनीच तोडगा काढावा, अशी मागणी नितीन पाटील यांनी केली. विष्णू गावडे, रवी नाईक, अशोक पेडणेकर, कृष्णा पाटील, मधुकर सडेकर, नारायण हसबे, राजू रेडेकर, प्रा. एस. व्ही. गुरबे, देवदास पाटील, सतीश सबनीस, शेतकरी उपस्थित होते.


















