कोल्हापूर : महाराष्ट्रात 2026-27 ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली असून, 5 नोव्हेंबरपर्यंत 138 साखर कारखान्यांकडून 108.73 लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 132.7 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 8.19 टक्के इतका आहे. राज्यात सध्या 64 सहकारी आणि 74 खाजगी कारखाने सुरु झाले आहेत. मागील हंगामात 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यात 115 साखर कारखाने सुरु झाले होते. त्यामध्ये 56 सहकारी आणि 59 खाजगी कारखान्यांचा समावेश होता.
कोल्हापूर विभागात आतापर्यंत केवळ 17 कारखानेच सुरु झाले आहेत. त्यामध्ये 12 सहकारी आणि 5 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. विभागात 14.68 लाख टन उसाचे गाळप होऊन 13.82 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा उतारा राज्यात सर्वाधिक 9.41 टक्के इतका आहे. ऊसदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य शेतकरी संघटनांचे सुरु असलेले आंदोलन गुरुवारी मध्यरात्री मागे घेण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर विभागात गाळप हंगामाला आता गती येणार आहे.
सध्या सोलापूर विभागात सर्वाधिक 30 साखर कारखाने सुरु झाले आहेत. त्यामध्ये 10 सहकारी आणि 20 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 25.19 लाख टन उसाचे गाळप करून 19.11 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागाचा सरासरी उतारा 7.59 टक्के इतका आहे. पुणे विभागात 27 कारखाने सुरु झाले असून त्यामध्ये 16 सहकारी आणि 11 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. विभागात तब्बल 37.32 लाख टन उसाचे गाळप झाले असून 33.26 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. विभागाचा उतारा 8.91 टक्के आहे.
नांदेड विभागात 27 कारखाने सुरु झाले असून त्यामध्ये 9 सहकारी आणि 18 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. कारखान्यांनी 17.96 लाख टन उसाचे गाळप करून 13.2 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा साखर उतारा 7.35 टक्के आहे. अहिल्यानगर विभागातील 20 कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे. त्यामध्ये 11 सहकारी आणि 9 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. 8.11 टक्के उताऱ्यासह कारखान्यांनी 20.8 लाख टन ऊस गाळप करून 16.87 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागात 15 कारखाने सुरु झाले आहे. त्यामध्ये 6 सहकारी आणि 9 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या सर्व कारखान्यांनी आतापर्यंत 15.24 लाख टन उसाचे गाळप करून 11.33 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा केवळ 7.43 टक्के इतका आहे. अमरावती विभागात 2 खाजगी कारखाने सुरु असून आतापर्यंत 1.51 लाख टन उसाचे गाळप होऊन 1.14 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. विभागाचा सरासरी उतारा 7.55n टक्के आहे. नागपूर विभागात अद्याप एकही कारखाना सुरु झाला नसल्याचे दिसते.


















