पुणे : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामास ११ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. कारखान्याने सुरुवातीपासून गाळपामध्ये आघाडी घेतली. कारखान्याने २६ व्या दिवशी दोन लाख टन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला. कारखान्याने गेल्या २६ दिवसांमध्ये गुरुवारी (ता. ५) दोन लाख एक हजार ६४९ टन उसाचे गाळप पूर्ण केले असून एक लाख ८९ हजार १०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर आणि संचालक मंडळाने ही माहिती दिली.
कारखान्याच्या संचालक मंडळाने सांगितले की, कारखाना क्षमतेपेक्षा अधिक गाळप करीत आहे. संचालक मंडळाने या गळीत हंगामामध्ये १२ लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २६ दिवसांमध्ये दोन लाख टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून साखरेच्या रिकव्हरीमध्ये वाढ होत असून गुरुवारी साखरेचा उतारा १०.४३ टक्के मिळाला असून सरासरी उतारा ९.६५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून ८४ लाख ५१ हजार ८०० युनिट विजेची निर्मिती झाली असून ५३ लाख ३० हजार युनिट वीज महावितरणला निर्यात केली आहे. कारखान्याने २५ ऑक्टोबरला, एका दिवसांमध्ये नऊ हजार ३५६ टन गाळपाचा विक्रमही केला आहे. कारखान्याचे दोन्ही युनिट क्षमतेपेक्षा अधिक उसाचे गाळप करीत आहेत. सभासद आणि शेतकऱ्यांनी सर्व ऊस आपल्या कारखान्याला देऊन सहकार्य करावे, असे आवाहन संचालक मंडळाने केले.


















