नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखाना संचलित अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अँड एनर्जी लिमिटेडला २०२५-२६ च्या गळीत हंगामात ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. थकीत एफआरपीच्या १ कोटी १६ लाख रुपयांपैकी ५८ लाख रुपये (५० टक्के) माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकारातून गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली. वारंवार पाठपुरावा करूनही दाद दिली जात नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांप्रती बांधिलकी म्हणून स्वखर्चातून एफआरपीची रक्कम देण्याचा निर्णय माजी खासदार गोडसे यांनी घेतला आहे. ७ डिसेंबर रोजी उर्वरित ५८ लाख रुपये देण्यात येणार असल्याचे गोडसे यांनी जाहीर केले. दरम्यान कारखान्याचे विविध पुरवठादार, व्हेंडर्स, कर्मचारी वेतन आणि अन्य देणी अद्याप प्रलंबित आहेत. या रकमांच्या वसुलीसाठी घावटे आणि कदम यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागितल्याचे गोडसे यांनी सांगितले.
नाशिक साखर कारखाना गेल्या गळीत हंगामात पुण्यातील राजगंगा कंपनीने चालविला होता. ऊसदर आणि गळीत हंगामाचा खर्च कंपनीचे मालक प्रसाद घावटे यांनी करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी रक्कम न दिल्याने शेतकऱ्यांचे ऊसबिल थकले. याबाबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने माजी खासदार गोडसे यांच्याकडे पाठपुरावा केला. गोडसे यांनी कंपनीच्या कार्यालयांना भेट देऊन थकीत रकमेबाबत विचारणा केली. मात्र, वारंवार आश्वासने मिळूनही पैसे अदा झाले नसल्याने त्यांनी स्वतः पैसे देण्यास सुरुवात केली आहे. आता घावटे यांनी मान्य केल्याप्रमाणे उर्वरित ३० टक्के रक्कम वसूल करण्यासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ धाराशिव येथील कारखाना व कार्यालयात जाणार आहे. शेतकऱ्यांना देणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


















