बेळगाव : ऊसदर निश्चित करण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात शेतकरी संघटनांनी आंदोलन तीव्र केले होते. जवळपास महिन्यापेक्षा अधिक काळापासून शेतकरी संघटनांनी ऊस दर वाढीची मागणी लावून धरली होती. या आंदोलनाचा परिणाम ऊस तोडणी हंगामावर झाला होता. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या ऊसदराच्या संघर्षामुळे रखडलेल्या ऊस तोडणी हंगामाला अखेर गती मिळाली आहे. ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटना, साखर कारखानदार आणि प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तोडगा निघाला आहे. त्यामुळे कारखान्यांनी ऊस तोडणी आणि गाळप प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.
शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या ऊसतोड मजुरांना आता काम मिळू लागले असून त्यांच्या रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागला आहे. ऊस तोडणीला वेगाने सुरुवात करण्यात आली आहे. मध्यंतरी तालुक्याच्या विविध भागांत ऊस तोडणीसाठी दाखल झालेल्या मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. महिन्यापेक्षा अधिक काळ कामाविना राहावे लागले. मजुरांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. आता हा प्रश्न सुटला आहे.


















