कोल्हापूर : येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसास प्रतिटन ४२०० रुपये ऊसदर देणार असल्याची घोषणा, कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी झालेल्या चर्चेप्रमाणे पहिला हप्ता प्रतिटन ३९०० रुपये, गळीत हंगाम समाप्तीनंतर १०० रुपये आणि अंतिम हप्ता २०० रुपये देणार असल्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे पहिला हप्ता प्रतिटन ३९०० रुपये शेतकऱ्यांना मिळणार असून, गळीत हंगाम समाप्तीनंतर १०० रुपये असे ४००० रुपये मिळणार आहेत. तसेच साखरेचे दर वर्षभर ४५०० रुपयांपेक्षा अधिक राहिल्यास दिवाळीपूर्वी २०० रुपयांप्रमाणे अंतिम हप्ता देण्याची घोषणा केली आहे.
चालू हंगामातील ऊसदर निश्चित करताना शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य दिले आहे. जाहीर केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत पैसे मिळणार असून, एकूण प्रतिटन ४२०० रुपये दर देण्यात येणार असल्याचे आमदार डॉ. कोरे यांनी सांगितले. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सर्व ऊस उत्पादक सभासदांनी ऊस गळितासाठी देऊन कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, उपाध्यक्ष प्रतापराव पाटील आणि कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी केले.


















