कर्नाटक : इथेनॉल मिश्रणाबाबत राज्य सरकारच्या तपासणीचा अहवाल योग्यच असल्याचा मंत्री रिझवान अर्शद यांचा दावा

बंगळूर : गेल्या शुक्रवारी राज्य सरकारने पेट्रोलमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक इथेनॉल मिसळल्याबाबत केलेली तपासणी आणि त्याचा अहवाल योग्य आहे. या अहवालातील निष्कर्षांवर राज्य सरकार ठाम आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जनतेला स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी मंत्री रिझवान अर्शद यांनी केली. अर्शद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कायदेशीर मापनशास्त्र विभागामार्फत (लिगल मेट्रोलॉजी) पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणाची तपासणी करण्यात आली. याचा अहवाल जनतेसमोर ठेवण्यात आला असून, या विषयावर केवळ कर्नाटकातच नव्हे, तर देशभरात चर्चा सुरू आहे. इथेनॉलचे प्रमाण आणि घनता यांसह सर्व चाचण्या नियमानुसार करण्यात आल्या आहेत. अहवालावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी त्यामागील वैज्ञानिक आधार तपासावा, असे ते म्हणाले. प्रत्येक नमुना संबंधितांना देण्यात आला असून, प्रयोगशाळेतही तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नमुन्यांच्या प्रक्रियेवर तेल कंपन्यांनी उपस्थित केलेले आक्षेप रिझवान अर्शद यांनी फेटाळले.

दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून तेल कंपन्या आपल्या पेट्रोल पंपांवर हायड्रोमीटरच्या साहाय्याने इथेनॉलचे प्रमाण तपासत आहेत आणि पेट्रोल योग्य असल्याचा दावा करीत आहेत. राज्य सरकारच्या तपासणीला महत्त्व न देणाऱ्या कंपन्या स्वतःच्याच कर्मचाऱ्यांकडून चाचण्या करून घेत आहेत. ही पद्धत कितपत योग्य आहे. राज्य सरकारचा अहवाल चुकीचा असल्याचा दावा करण्याऐवजी तेल कंपन्यांनी नमुने सरकारकडे पाठवायला हवे होते. त्यांची पुन्हा तपासणी करून योग्य उत्तर देता आले असते. स्वतःच्या अधिकाऱ्यांकडून चाचणी करून सरकारी अहवाल फेटाळणे योग्य नाही. इथेनॉल मिश्रणाच्या प्रमाणाबाबत राज्य सरकारचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्र सरकार आणि तेल कंपन्या संयुक्त तपासणीचा प्रस्ताव देत असल्याबद्दलही अर्शद यांनी प्रश्न उपस्थित केला. राज्य सरकारने सुरुवातीला ६३ नमुने पाठविले होते, तेव्हा संयुक्त तपासणीसाठी का बोलावले नाही? अहवाल जाहीर झाल्यानंतरच संयुक्त तपासणीची आठवण का झाली? अशी विचारणा त्यांनी केली.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here