पुणे : ऐन दिवाळीत ऊस तोडणीला जोर, लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही मजुरांच्या हातात कोयता !

पुणे : जुन्नर तालुक्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाल्याने बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि धुळे आदी जिल्ह्यांतून ऊसतोड मजूर कुटुंबांसह दाखल झाले आहेत. सहा महिन्यांच्या हंगामातील मजुरीवर वर्षभराचा संसार चालवायचा असल्याने त्यांना सणासुदीलाही कामातून सुटी घेणे परवडत नाही. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही अनेक मजूर ऊसतोड करताना दिसले. जुन्नर तालुका बिबटप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. उसाच्या फडात बिबट्यांचा वावर असल्याने रात्री-अपरात्री काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर आहे. गेल्या काही वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांत ऊसतोड मजुरांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे अपुऱ्या निवाऱ्यासोबतच मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्साह, घराघरांत पणत्यांची रोषणाई आणि फराळाची लगबग सुरू असताना आळेफाटा परिसरातील उसाच्या फडात मात्र कोयत्यांचे वार सुरूच होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड सुरू ठेवावी लागल्याने या मजुरांची दिवाळी फडातच साजरी झाल्याचे चित्र दिसले. ऊसतोड मजूर साखर उद्योगाचे चक्र गतिमान ठेवण्यासाठी मोलाचे योगदान देतात. मात्र, त्यांच्या मुलांचे शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि सुरक्षित निवारा या मूलभूत गरजांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन आणि साखर कारखान्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या उसाच्या फडाशेजारी प्लास्टिक कागद, ताडपत्री आणि बांबूच्या साहाय्याने उभारलेल्या तात्पुरत्या झोपड्यांमध्ये या मजुरांचा संसार सुरू आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here