बेळगाव : ऊसतोडीसाठी पैशांची मागणी केल्यास टोळीला गावाबाहेरचा रस्ता; शेतकऱ्यांचा ठाम निर्धार

बेळगाव : ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांकडून पैशांची मागणी करणाऱ्या ऊसतोड टोळ्यांविरोधात कुर्ली (ता. निपाणी) येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. ऊसतोडीच्या नावाखाली कोणत्याही मुकादमाने शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी केल्यास संबंधित टोळीला गावातून हद्दपार करण्याचा ठाम इशारा कुर्ली ऊसदरवाढ समिती आणि शेतकरी बांधवांनी दिला आहे.

कुर्ली गावात ऊसतोड करणाऱ्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांचे अधिकारी, फिल्डमन, गट अधिकारी तसेच कारखान्यांच्या वतीने गावपातळीवर काम करणाऱ्या प्रतिनिधींना समितीने यासंदर्भात स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ऊसतोड टोळ्यांचे मुकादम शेतकऱ्यांकडे पैशांची मागणी करत असल्यास संबंधित कारखान्यांच्या अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून हा प्रकार रोखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.यापुढे कोणताही मुकादम किंवा टोळीप्रमुख शेतकऱ्यांकडे पैसे मागताना आढळल्यास संबंधित टोळीला कुर्ली गावातून हद्दपार केले जाईल. तसेच अशा प्रकाराला संबंधित साखर कारखान्याचे अधिकारी आणि फिल्डमन जबाबदार धरले जातील, असा इशाराही समितीने दिला आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी स्वतःहून पैसे देण्याची तयारी दर्शवली तरी कारखान्यांच्या प्रतिनिधींनी ते स्वीकारू नयेत. अशा प्रकाराची माहिती तातडीने ऊसदरवाढ समितीला द्यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत.गावातील कोणत्याही शेतकऱ्याकडे कारखान्याचा प्रतिनिधी, मुकादम किंवा टोळीप्रमुख पैशांची मागणी करत असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी त्वरित समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची एकजूट कायम

यंदा कुर्लीतील शेतकरी एकजुटीने उभे राहिले असून, ऊसतोडीसाठी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत, यासाठी समिती कटिबद्ध आहे. ऊसतोडीच्या नावाखाली होणारी आर्थिक पिळवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा ठाम निर्धार शेतकरी बांधवांनी व्यक्त केला आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here